ऑनरचा प्रोटोटाईप फोन शोधून द्या, ४ लाख रु. मिळवा


स्मार्टफोन हरविणे कुणासाठीही मोठे संकट असते. त्यात हा फोन एखाद्या टेक कंपनीचा प्रोटोटाईप असेल तर हे संकट किती गहिरे होते याची कल्पना सर्वसामान्य माणसाना येणार नाही. प्रोटोटाईप म्हणजे कोणत्याची कॉन्सेप्टचे साकारले गेलेले पहिले रूप असते आणि यावरून तसे फोन बनविले जातात. सध्या हुवाईया प्रसिद्ध चीनी स्मार्टफोन कंपनीचे उपकंपनी ऑनर अश्या संकटातून जात आहे कारण त्यांचा अपकमिंग प्रोटोटाईप स्मार्टफोन त्यांच्याच एका कर्मचारयाच्या हातून ट्रेनमध्ये हरविला आहे. जर्मनी मध्ये ड्यूसलडार्फ ते मुनिक रेल्वे प्रवासात हा प्रोटोटाईप २२ एप्रिल रोजी हरविला.

फोन हरविल्याचे कळताच कंपनीने त्वरित फोन आणून देणाऱ्यास ५००० युरो म्हणजे सुमारे ४ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. कंपनीने त्यांच्या ट्विटर अकौंटवरून ज्या रेल्वे मध्ये फोन हरविला तिचा नंबर आयसीए ११२५ असा संदर्भ दिला आहे. हा फोन ज्यांना मिळेल त्यांनी कृपया परत करावा असे आवाहनही कंपनीने केले आहे. हा फोन ग्रे कलरच्या प्रोतेक्टीव्ह केस मध्ये असल्याचा संदर्भही दिला गेला आहे.

ऑनर त्यांच्या ऑनर २० सिरीजचे फोन २१ मे रोजी लंडन येथे लाँच करण्याच्या तयारीत आहे. हरविलेला फोन त्यापैकी एक असावा असा अंदाज आहे. कंपन्या नेहमीच नवीन फोन अधिकृतपणे लाँच करण्याअगोदर आपल्या कर्मचार्यांना टेस्टिंग साठी देतात. अर्थात ही प्रीप्रोडक्शन डिव्हायसेस केसमध्ये ठेवली जातात कारण लाँच पूर्वी त्याचे डिझाईन, स्पेसिफिकेशन लिक होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. ऑनरचा हरविलेल्या प्रोटोटाईप शोधून देणाऱ्यास इतके मोठे इनाम जाहीर करण्यामागे हेच कारण असावे असे सांगितले जात आहे. अर्थात ऑनरच्या प्रतिस्पर्धी कंपन्या ऑनरचा हरविलेला प्रोटोटाईप आणून देणाऱ्यास आणखी मोठे इनाम देण्याची शक्यता आहेच.

या पूर्वी अॅपल आयफोन फोर चा प्रोटोटाईप एका पब मध्ये हरविल्याची घटना घडली आहे. तसेच गुगल पिक्सल ३ एकसएल कॅबमध्ये राहिल्याची घटनाही घडली आहे. आता ऑनरवर ही वेळ आली असून अजून नवीन फोन लाँच होण्यास भरपूर वेळ असल्याने हा प्रोटोटाईप परत मिळविण्याचा कंपनी आटोकाट प्रयत्न करत आहे. तो मिळाला नाही तर कंपनी शोध थांबवेल कारण एकदा फोन लाँच झाला कि प्रोटोटाईप चा कंपनीला फारसा उपयोग नाही असे समजते.

Leave a Comment