या राज्यावर पडतात पहिली सूर्यकिरणे


जगात जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते तसेच भारतचा विचार केला तर अरुणाचल प्रदेश हे देशातील पहिली सूर्यकिरणे पडणारे राज्य असे म्हणता येईल. अरुणाचल याचा अर्थच मुली उगवत्या सूर्याचा पर्वत असा आहे. भूतान आणि म्यानमार आणि तिबेटला या राज्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. उंच उंच पहाड, हिरवीगार वनसंपदा आणि ५०० हून अधिक जातीची सुंदर आर्किड फुलणारी जंगले असलेले हे राज्य पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण आहे.


कालिका पुराणात तसेच महाभारतात या प्रदेशाचा उल्लेख येतो. परशुराम आणि व्यास ऋषी यांची ही ध्यानभूमी. असेही मानतात कि श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह येथे झाला होता. या प्रदेशाचे अध्यात्मिक महत्व आहे तसेच ऐतिहासिक महत्वही आहे. या प्रदेशावर सूर्य लवकर उगवतो तसाच तो लवकर मावळतोही. दुपारी तीन वाजताच येथे अंधार होतो आणि पहाटे चार वाजता उजाडलेले असते. १९६२ पूर्वी नॉर्थ इस्ट फ्रंटीअर एजन्सी म्हणजे नेफा या नावाने हा प्रदेश ओळखला जात होता आणि १९७२ मध्ये तो केंद्रशासित अरुणाचल प्रदेश राज्य झाला. २० फेब्रुवारी १९८७ मध्ये ते भारताचे २४ राज्य घोषित केले गेले.

निसर्गाने समृद्ध, साहसी स्पोर्ट्सचे माहेरघर असलेल्या या राज्यात वर्षभर पर्यटक येतात. स्वच्छ नद्या, हिरवीगार लुसलुशीत भातशेती, लोहित, सियांग, सुबानसिरी या सुंदर नद्यातून राफ्टींग आणि कयाकिंग करण्याचा आनंद, भोवतीच्या पहाडांवर ट्रेकिंगची मजा, मोटर बाईक अॅडव्हेंचर साठी अवघड रस्ते अशी अनेक आकर्षणे येथे आहेत.


येथील झिरो व्हॅलीला धान्याचे कोठार म्हटले जाते. येथील भातशेती, चीड, देवदार वृक्षांची घनदाट जंगले आणि सभोवार बर्फाची शिखरे, खळाळनाऱ्या स्वच्छ नद्या आणि बौद्ध भिक्षूंची भजने हे येथील मुख्य आकर्षण.


राज्याच्या पश्चिम टोकावर असलेले तवांग हे तिबेट सीमेवरील ठिकाण. येथे थंडी खूप आणि मोनापा आदिवासी लोकांचा हा रहिवास. या आदिवासींच्या राहण्याचा, बोलण्याच्या, कपडे, खाद्यपदार्थ यांच्या वेगळ्या तऱ्हा येथे पाहायला मिळतात. तसेच येथून माधुरी लेक, गोरीचेन पीक, नुरानंग फॉल्स, तवांग मोनेन्स्ट्री पाहता येते. तसेच जांग धबधबा पाहता येतो.

बॉमडिला हे छोटेसे पण सुंदर शहर समुद्रसपाटीपासून ८ हजार फुट उंचीवर असून ट्रेकिंग शौकिनांची ही पंढरी. इटानगर ही अरुणाचलची राजधानी. येथेही नद्या, जंगले, पर्वत यांच्या भटकंतीचा आनंद लुटता येतो. अलोंग हे छोटी छोटी गावे असलेले ठिकाण येथेही खोल दऱ्या, उंच पहाड यांच्या सानिध्यात राहता येते. मेचुका घाटी, दोनियो मंदिर, पुवक घात, मालीनिथान, पातुम ब्रिज ही आणखी काही प्रेक्षणीय स्थळे जरूर पहावीत.

Leave a Comment