देशभक्ती कशी असावी – एक इराणी धडा


पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, हे आता जगात जवळजवळ सर्वांना मान्य आहे. आतापर्यंत हजारो भारतीय सैनिकांचा बळी पाकिस्तानने घेतला आहे. मात्र भारतच नव्हे तर इराण आणि अफगाणिस्तान या आपल्या शेजारी देशांनाही पाकिस्तानने असेच त्रस्त केले आहे. त्यावर सरकारी पातळीवरून कूटनीतिक आणि सैनिकी अशा दोन्ही पातळ्यांवर कारवाई होतेच, मात्र तेथील सजग नागरिक संघटनांही पाकिस्तानची लबाडी उघड पाडण्यासाठी पुढे सरसावतात.

इराणमधील दहशतवादाने पीडित कुटुंबांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका इराण संघटनेने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहिले आहे. इराणशी लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेवर कठोर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. पाकिस्तानमध्ये तळ ठोकून असलेल्या दहशतवाद्यांना इराणच्या भूमीवर हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी पावले उचलावीत, असे या संघटनेने म्हटले आहे.

हबिलियन असोसिएशन असे या संघटनेचे नाव आहे. या संघटनेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या नावे खुले पत्र लिहिले असून शनिवारी हे पत्र सर्व माध्यमांसाठी प्रसृत करण्यात आले. इम्रान खान यांनी रविवारी आणि सोमवारी इराणचा दौरा केला. त्याच्या आदल्या दिवशी हे पत्र जाहीर करण्याची टायमिंग या संघटनेने साधली. गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक इराणी सुरक्षा रक्षकांना हौतात्म्य पत्कारावे लागले, याकडे या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

“सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आणि सीमेवर गंभीर नियंत्रणाचा अभाव असल्यामुळे दहशतवादी गट वेळोवेळी इराणमध्ये प्रवेश करतात, घातपाती व दहशतवादी कृत्ये करतात आणि परत जातात. ही कृत्ये गेली अनेक वर्षे सुरू असून दुर्दैवाने पाकिस्तानने हे हल्ले रोखण्यासाठी कोणतीही गंभीर कारवाई केलेली नाही,” असे या पत्रात म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी आजही काही इराणी सुरक्षा सैनिकांना बंदी बनवले आहे आणि यातूनच हे दहशतवादी गट कसे मुक्तपणे कार्यरत आहेत, याची खात्री पटते असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान व इराणच्या सीमेवरील सर्वात अलीकडील हल्ला सिस्तान-आणि-बलुचिस्तान प्रांतात फ्रेब्रुवारी महिन्यात झाला होता. त्यात इराणचे 27 सैन्य अधिकारी शहीद झाले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दहशतवाद्यांनी सीमेवरून 12 इराणी सैनिकांचे अपहरण केले होते आणि त्यातील काही जण आजही दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. त्यापूर्वी एक मोठा हल्ला एप्रिल 2017 मध्ये झाला होता आणि त्यात 10 इराणी सीमा रक्षकांना दहशतवाद्यांनी मारले होते.

जैश-उल-अद्ल या दहशतवादी गटाने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली होती. हा गट पाकिस्तानमध्ये असून त्याचे अल-कायदाशी संबंध आहेत. हे हल्ले एवढे विकोपाला गेले होते, की सीमा रेषा ओलांडून इराणमध्ये येणाऱ्या दहशतवाद्यांना रोखले नाही तर पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करू, असा इशारा इराणच्या सैन्य प्रमुखांनी दिला होता. पाकिस्तानने आपल्या सीमेवर लक्ष देऊन दहशतवाद्यांना अटक करावी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करावे, अशी मागणी त्यांनी तेव्हा केली होती. दहशतवादी कारवाया आणि अमली पदार्थांची तस्करी यामुळे इराण- पाकिस्तान सीमारेषेवर नेहमीच तणाव असतो.

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना दिली जाणारी मदत आणि केली जाणारी पाठराखण ही भारताप्रमाणेच इराणचीही समस्या आहे. म्हणूनच शनिवारीच पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दावा केला होता, की इराणी सीमेवर स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तानने पावले उचलली आहेत. “शांतता सीमा” असे नाव देण्यात आलेल्या योजनेअंतर्गत ही पावले उचलण्यात आली. याच प्रकल्पाचा भाग म्हणून दोन्ही देशांनी संयुक्त सीमा केंद्रे स्थापन करण्यास सुरवात केली आहे.

दहशतवादामुळे सर्वाधिक नागरिक गमावणाऱ्या देशांमध्ये इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा समावेश होतो, याकडे या संघटनेने लक्ष वेधले आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानला स्वतःचा विकास करायचा असेल, तर त्याला निश्चितपणे दहशतवादाचा सामना करावा लागेल, असेही संघटनेने बजावले आहे.

आपल्या देशाचे हित आणि सुरक्षा यांचा विचार करून परकीय देशाला, तेही पाकिस्तानसारख्या उपद्रवी देशाला, खडसावणाऱ्या संघटना इराणसारख्या देशात आहेत. आपल्याकडे पाकिस्तान म्हटले की अनेकांना प्रेमाचे भरते येते. भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी, यासाठी पाकिस्तानपेक्षा आपलेच लोक जास्त आरडाओरडा करतात. पाकिस्तानची सरबराई करण्यासाठी आपल्या लोकांमध्ये अहमहमिका लागते. त्यांच्यासाठी इराणच्या या संघटनेचा धडा अत्यंत उद्बोधक ठरतील. आपल्याकडे अशा संघटना कधी येणार?

Leave a Comment