तो फोन खाली ठेवा आणि जगायला शिका – अॅप्पल सीईओचा मंत्र


तंत्रज्ञानाने आपल्या जीवनावर ताबा मिळवला आहे. त्यातही स्मार्टफोन हा आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. थोड्या थोड्या वेळाने फोन तपासण्याची अनेकांना सवय लागली आहे आणि काही जणांना तर या फोनचे गंभीर व्यसन लागले आहे. मात्र तंत्रज्ञान उद्योगातील सर्वात शक्तिमान व्यक्तीने जेव्हा आपल्या जीवनाच्या अविभाज्य भागाबद्दल वक्तव्य केले तेव्हा संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात चर्चेला उधाण आले.

अॅप्पल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी हे वक्तव्य केले. टाईम 100 या शिखर परिषदेत बोलताना मोबाईल फोनचे व्यसनी स्वरूप आणि त्यातील अॅप्पलच्या भूमिकेची कूक चर्चा करत होते. त्यावेळी ते म्हणाले, की लोकांनी सतत आपल्या आयफोनचा वापर करावा, अशी कंपनीची इच्छा नव्हती. अलीकडच्या काळात तर आपण स्वतः पुश नोटिफिकेशन बंद केल्याचेही त्यांनी सांगितले.

वापरकर्त्यांनी अधिकाधिक वेळ घालवावा ही अॅप्पलची इच्छा नव्हती, असेही त्यांनी सांगितले. “मी स्वतःला विचारले- ‘मला खरंच दिवसातून हजारो अधिसूचना मिळविण्याची गरज आहे का? त्यामुळे माझ्या जीवनाला काही अधिक मूल्य मिळत नव्हते किंवा मी एक अधिक चांगली व्यक्ती बनत नव्हतो. आणि म्हणून मी ते थांबविले,” असे ते म्हणाले.

कूक यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही प्रत्येक वेळी आपला फोन उचलता तेव्हा त्याचा अर्थ असा, की तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहात किंवा व्यवहार करत आहात, त्यांच्यावरची नजर हटवता आणि फोनकडे पाहता. एखाद्याच्या डोळ्यांत पाहण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या फोनकडे अधिक पहात असल्यास तुम्ही चुकीची गोष्ट करत आहात. “लोक काय करत आहेत, याबद्दल आम्ही त्यांना शिक्षित करू इच्छितो. आपण बाकी गोष्टी करतो तसेच यातही सुधारणा होईल. अन्य गोष्टींप्रमाणेच आम्ही यातही नवीन प्रयोग करू, असे ते म्हणाले.

टीम कूक यांचे हे वक्तव्य विस्ताराने मुद्दाम दिले आहे. कारण आज त्यांची कंपनी जगात स्मार्टफोनला पर्याय म्हणून पाहिली जाते. अॅप्पलचा फोन किंवा संगणक जवळ असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. अशा कंपनीच्या प्रमुखानेच मोबाईलपासून दूर राहा हे सांगणे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. सोनाराने कान टोचले असा आपल्याकडे जो वाक्प्रचार आहे त्याचा हा मासला आहे.

इंटरनेट आणि मोबाईल यांचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले असून खासकरून युवकांना त्याचा सर्वाधिक धोका असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. अमेरिकेतील इलियाना विद्यापीठाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक अॅकलेक्झॅन्ड्रो लिइरस यांनी या संबंधात संशोधन केले आहे. मोबाईलच्या व्यसनामुळे युवकांमध्ये चिंता आणि उदासीनतेचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष त्यांच्या नेतृत्वाखालील संशोधकाच्या चमूने काढला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढवणार्याल तंत्रज्ञानाचा समाजात प्रसार झाला असून, त्यामागची पार्श्वाभूमी मोठी आहे, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ही भीती विशेषतः दूरचित्रवाणी, व्हिडिओ गेम आणि सध्याच्या स्मार्टफोनसारख्या माध्यमातून पसरवली जात आहे.

आज मोबाईल फोनने सर्वांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. कित्येक तरुण ज्या पद्धतीने स्मार्टफोन वापरतात त्यावरून त्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागलेय असे म्हणावयास काहीच हरकत नाही. हे व्यसन लागलेल्या व्यक्ती मोबाईलशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांना फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सतत भीती वाटते. अशा व्यक्ती सतत मोबाईलमध्येच रममाण असतात. हळूहळू ते कुटुंब आणि मित्रांपासून लांब होऊन आपल्याच विश्वात गुंग होतात. एवढेच नव्हे तर त्यांना तहान-भूकेचीही शुद्ध राहात नाही.

वैद्यकीय क्षेत्रात या व्यसनाला एक नावही आहे – ‘नोमोफोबिया’. ‘नोमोफोबिया’ म्हणजे ‘नो मोबाईल फोबिया’ म्हणजेच काय तर मोबाईल जवळ नसल्यावर अस्वस्थ, बेचैन व्हायला होणे, मोबाईलविना बसण्याची भीती वाटणे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ‘नोमोफोबिया’ची लक्षणे सर्वात जास्त दिसून आली. मोबाईलची उपयुक्तता अर्थातच नाकारता येत नाही, परंतु अति सर्वत्र वर्जयेत् हा मंत्र येथेही लागू होतो.

अन् म्हणूनच पुढील पिढीला या धोक्यापासून वाचविण्यासाठी टीम कूकसारखी माणसे आपल्याला भान आणायचा प्रयत्न करत आहेत. “आपण बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक राहायला हवे. आपण जे काही करत आहोत ते योग्य नाही, हे आपल्याला मान्य केले पाहिजे. तंत्रज्ञानावर नियंत्रण असायलाच पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांची ही शिकवण आपण ऐकणार का, हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर देताना आपणही प्रामाणिक राहायला हवे.

Leave a Comment