गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार


टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज, आयपीएल दिल्ली डेअरडेव्हिल्सचा माजी कप्तान गौतम गंभीर याने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा उमेदवारी अर्ज पूर्व दिल्ली मतदारसंघातून मंगळवारी दाखल केला आहे. या वेळी निवडणूक आयोगाला त्याने त्याच्या स्थावर जंगम मालमत्तेची माहिती अर्जात भरून दिली असून त्यानुसार दिल्लीच्या सर्व सात जागांसाठी रिंगणात असलेल्या कोणत्याची पक्षाच्या उमेदवारात गौतम अधिक श्रीमंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गौतमच्या अर्जानुसार त्याची एकूण मालमत्ता १४७ कोटींची असून त्यात ११६ कोटींपेक्षा जास्त चल व २८ कोटींची अचल संपत्ती आहे असे नमूद करण्यात आले आहे.

गौतम गंभीरने क्रिकेट मधून निवृत्ती घेतानाच राजकारणात येण्याचे संकेत दिले होते आणि त्यानुसार त्याने भाजपचे सदस्यत्व घेतले होते. त्याला पक्षाने लगेचच पूर्व दिल्ली मधून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गौतमने त्याच्या संपत्ती तपशिलात त्याला ३४.२० कोटींचे कर्ज असल्याचेही नमूद केले आहे. गौतमने २०१७-१८ च्या वर्षात आयकर विवरण पत्रात त्याची कमाई १२ कोटी ४० लाख रुपये असल्याचे दाखविले आहे. गौतम याच्यावर फसवणुकीचा एक दावा दाखल असून त्याचा निकाल अद्यापि लागलेला नाही. गौतमने दिल्ली हिंदू विद्यापीठाच्या हिंदू कॉलेज मधून पदवी मिळविलेली आहे.

दरम्यान कॉंग्रेसच्या तिकिटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक रिंगणात उतरलेला भारताचा मुष्टियोद्धा विजेंदरसिंग याने त्याची संपत्तीचे विवरण देताना त्याच्याकडे ३.५७ कोटी आणि ५.०५ कोटींची चल आणि अचल संपत्ती असल्याचे निवडणूक आयोगासमोर सादर केले आहे.

Leave a Comment