किम जोंग उन – पुतीन यांच्या भेटीवर अमेरिकेचे लक्ष


उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये गुरुवारी पहिली शिखर वार्ता होत असून या भेटीसाठी किम बुधवारी त्याच्या खास पोलादी रेल्वेतून रशियातील व्लादिवोसोक या ठिकाणी पोहोचला आहे. किम जोंग यांची ही पहिलीच अधिकृत रशिया भेट असून उत्तर कोरियातून काही तासांच्या प्रवासानंतर तो रशियात पोहोचला आणि स्टेशनवर थांबलेल्या त्याच्या खास रेल्वेतून बऱ्याच वेळानंतर खाली उतरला असे समजते.


रशियन टीव्हीला मुलाखत देताना किम जोंग उन यांनी पुतीन यांच्याबरोबरची चर्चा सफल होईल अशी आशा व्यक्त केली. कोरिया प्रायद्वीपात शांती राहावी आणि उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत व्हावेत या साठी ही भेट असल्याचे ते म्हणाले. पुतीन आणि किम जोंग व्लादिवोसोक जवळ असलेल्या एका बेटावर भेटत असून या भेटीवर अमेरिकेचे लक्ष लागले आहे. पुतीन आणि किम यांच्यातील ही पहिलीच चर्चा आहे मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर किम जोंग यांनी यापूर्वी दोन वेळा भेट घेऊन चर्चा केलेली आहे मात्र त्यातून कोणतीही ठोस निष्पत्ती झालेली नाही. किम पुतीन भेटीत प्योंगपांग येथील अणु कार्यक्रम बाबत विशेष चर्चा अपेक्षित असल्यचे सागितले जात आहे.

किम जोंग आणि डोनाल्ड ट्रम्प याच्यातील दुसरी बैठक व्हिएतनाम मध्ये झाल्यानंतर दोन महिन्यांनी पुतीन यांची भेट होत आहे. कोरियावर असलेले निर्बंध शिथिल केले जावेत यासाठी किम जोंग उन आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील नाते नेहमीच जवळचे राहिलेले आहे आणि पुतीन यांच्या भेटीने हे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment