उडत्या तबकड्या असतात का? अमेरिकी नौदल म्हणते ‘हो’


माणसासारख्याच अन्य काही जाती या आकाशगंगेवर राहतात का, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसारखीच अन्य माणसे आहेत का ही उत्सुकता मानवांना प्राचीन काळापासून आहे. अवकाशातून पृथ्वीकडे येताना, पृथ्वीभोवती फिरताना किंवा अतिशय वेगाने उडताना लोकांना दिसल्याचे अनेकदा सांगण्यात येते. अशा प्रकारच्या वस्तूंना यूएफओ (अनआयडेंटीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स) किंवा उडत्या तबकड्या असे म्हणतात. या यूएफओमधून परग्रहवासी येतात, असेही मानले जाते. आतापर्यंत यूएफओ पाहिल्याच्या अनेक घटना नोंदल्या गेल्या आहेत, दावे करण्यात आले आहेत. मात्र त्यासंबंधी अधिकृत उल्लेख आढळून येत नाहीत.

परंतु आता ही परिस्थिती बदलण्याचा निश्चय अमेरिकेच्या लष्कराने केला आहे. यूएफओ पाहिल्याचा संशय आल्यास अमेरिकी नौदलाच्या वैमानिकांनी त्याची कशी माहिती द्यावी, कशी नोंद करावी याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना अमेरिकी नौदलाने जारी केल्या आहेत. “अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तूंची माहिती योग्य त्या अधिकाऱ्यांना देण्यासाठीची प्रक्रिया आम्ही अपडेट करत असून त्याला औपचारिक रूप देत आहोत,” असे अमेरिकी नौदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अर्थात परग्रहवासी माणसे अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात फिरत आहेत, असे अमेरिकी नौदलाला वाटत नाही. मात्र गेल्या काही काळात लष्करी हद्दीत आणि हवाई क्षेत्रात अज्ञात वस्तू फिरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सीएनएन वाहिनीला सांगितले.

अमेरिकेचे संरक्षण खाते असलेल्या पेंटॉगॉनने अशा वस्तूंची माहिती काढण्याच्या अनेक प्रकल्पांना निधी पुरवठा केला होता. मात्र अशा प्रकारच्या शेवटच्या अधिकृत प्रकल्पाला 2012 साली टाळे ठोकण्यात आले होत. लुई एलिझोंडो या अधिकाऱ्याने त्या निर्णयाच्या विरोधात राजीनामा दिला होता. आपण या आकाशगंगेत एकमेव नाही आहोत, माणसासारखे अन्य प्राणी अस्तित्वात आहेत याचा दाट पुरावा उपलब्ध आहे, असा दावा एलिझोंडो यांनी केला होता. अर्थात तेव्हाही त्यांनी आपण सरकारच्या वतीने बोलत नसल्याचे स्पष्ट केले होते. परग्रहवासियांच्या विमानांनी पृथ्वीवर प्रवेश केला होता, याचे अनेक स्पष्ट पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले होते.

तुर्कस्तान, रशिया आणि अमेरिकेत उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा अनेकांनी केली आहे. चार्ल्‌स फोर्ट या संशोधकाने 20व्या शतकाच्या सुरुवातीस अशा प्रकारच्या दाव्यांचा संग्रह असलेले पुस्तक प्रसिद्ध केले होते. केनेथ आर्नल्ड नावाच्या एका व्यापाऱ्याला 24 जून 1947 रोजी विमानातून जात असताना रेनिअर पर्वताजवळ काही तेजस्वी, बशांच्या आकाराच्या व साधारण विमानापेक्षा मोठ्या वस्तू प्रचंड वेगाने जाताना आढळल्या. ह्या गोष्टीला मोठी प्रसिद्धी मिळाली व थोड्याच काळात आकाशातून उडणाऱ्या अशा विविध आकारांच्या वस्तू पाहिल्याचे अनेक वृत्तांत प्रसिद्ध होऊ लागले. नॉर्वे, स्वीडन, रशिया इ. देशांतील अनेक लोकांनी 1946 पासून अशा वस्तू पाहिल्याचे सांगण्यास सुरूवात केली.

यातील काही वस्तू (यान किंवा विमाने) कित्येक तास एकाच ठिकाणी स्थिर स्थितीत फिरताना दिसल्या, तर काही क्षणार्धात चमकून प्रचंड वेगाने नाहीशा झाल्या. या यानांचे आकार फुग्यांसारखे, नळकांड्यांसारखे आणि सिगारच्या आकाराचेही असल्याचे पाहणाऱ्यांनी सांगितले. मात्र बहुतांश वस्तू या तबकडीच्या किंवा बशीच्या आकाराच्या होत्या. एलिझोंडो यांच्या मते, यातील अनेक यानांचे आकार आणि गती आपल्या एरोडायनामिक्सच्या नियमांमध्ये न बसणारी होती. याच नियमांवर आपली सर्व विमाने व रॉकेट चालतात.

अनेक व्यक्तींनी या तबकड्यांमधून प्रखर प्रकाश किंवा स्फुल्लिंगे बाहेर पडताना पाहिल्याचेही म्हटले आहे. इतकेच नव्हे तर काही विमान चालकांनी प्रकाशित तबकड्या त्यांच्या विमानाजवळ आल्याचे व काहींनी त्यांचा पाठलाग केल्याचेही सांगितले.

अमेरिकी सरकारने आपल्या हवाई दलाकडे या उडत्या तबकड्यासंबंधीच्या वृत्तांतांची छाननी करण्याचे काम सोपवले होते. हवाई दलाने एका गोपनीय प्रकल्पांतर्गत या दाव्यांची छाननी केली. यातील बहुतांश दावे हे विश्लेषण करण्याच्या दृष्टीने अगदीच विस्कळीत स्वरूपाचे असल्याचे मत दलाने व्यक्त केले, तर इतर घटनांचे स्पष्टीकरण करणे शक्य आहे, असे मत दिल. तसेच या उडत्या तबकड्या राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याच्या नसून त्या बाह्य अवकाशातून आलेल्या असाव्यात यासंबंधी कोणताही विश्वासार्ह निर्णायक पुरावा नाही, असेही हवाई दलाने स्पष्ट केले होते. मात्र टीकाकारांनी त्यावरही आक्षेप घेतले. या वस्तू बाह्य अवकाशातूनच आलेल्या असून त्यासंबंधीची माहिती प्रसिद्ध केल्यास केवळ जनतेत घबराट उत्पन्न होईल, म्हणूनच सरकार खरी गोष्ट लपवत आहे, असा दावा या टीकाकारांनी केला होता.

गेली 50 वर्षे या विषयावर भवती न भवती होत आहे, मात्र त्यावर कुठलाही ठोस निष्कर्ष आजपर्यंत निघू शकलेला नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या नौदलाने जारी केलेल्या नव्या आदेशामुळे मात्र या विषयाला पुन्हा उठाव मिळाला आहे, हे नक्की.

Leave a Comment