अरुण गवळीच्या संचित रजेला नागपूर खंडपीठाकडून मंजुरी

arun-gawali
नागपूर – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी शिक्षा भोगत असून गवळीची २८ दिवसांची संचित रजा देण्याची मागणी कारागृह प्रशासनाने फेटाळून लावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गवळीने धाव घेतल्यानंतर त्याची रजा खंडपीठाने मंजूर केली आहे.

संचित रजा कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी द्यावी, अशी मागणी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे केली होती. पण, तो कारागृह प्रशासनाने अर्ज फेटाळल्याने गवळीने खंडपीठात संचित रजेकरिता अर्ज दाखल केला होता.

मुंबईत लोकसभेची मतदान प्रक्रिया २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. गवळीला नागपूर खंडपीठाने ३० एप्रिलपासून संचित रजा मंजूर केल्यामुळे गवळीला २८ दिवसांसाठी रजा मिळणार आहे.

संचित रजा अरुण गवळीला दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात उपस्थित केला. बचाव पक्षाने यावर बाजू स्पष्ट करताना म्हटले की, गवळीला यापूर्वी ‘पॅरोल’ किंवा ‘फर्लो’वर सोडण्यात आले. तेव्हा त्याने कुठल्याही नियमांचा भंग केलेला नाही. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर म्हणजेच ३० एप्रिल पासून ही रजा मंजूर करण्यात आली आहे.

Leave a Comment