इंडोनेशियाने बनवला रामायणावर आधारित विशेष स्टॅम्प

indonesia
जकार्ता – भारत आणि इंडोनेशियामधील राजकीय संबंधांच्या 70 वर्षांच्या पुर्ततेच्या निमित्ताने एक विशेष स्टॅम्प तिकीट इंडोनेशियाने तयार केले आहे. रामायणाची थीम त्यावर साकारण्यात आली असल्याची माहिती भारताच्या दुतावासाकडून देण्यात आली आहे.

इंडोनेशियाचे सुप्रसिद्ध मूर्तीकार पद्मश्री बपक न्योमन नुआर्ता यांनी या स्टॅम्पचे डिझाईन केले आहे. रामायणातील घटना या तिकीटावर छापण्यात आल्या आहेत. सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवत असलेला जटायू याचे चित्रण त्यावर करण्यात आले आहे. जगातील सर्वात जास्त मुस्लीम बहुल देशांपैकी भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश एक आहेत. हिंदू, बौद्ध आणि इस्लामचा इंडोनेशियातील प्रसार भारताच्या माध्यमातूनच झाला आहे. भारत आणि इंडोनेशिया स्वातंत्र्य लढ्यातही एकमेकांसोबत होता. भारत आणि इंडोनेशियातील संबंध हिंदू मंदिर आणि बोरोबुदूर बौद्ध मंदिर, रामायण आणि महाभारत यावर आधारित असल्याची यापाठीमागची धारणा आहे.

भारताचे राजदूत प्रदीप कुमार रावत आणि इंडोनेशिया उपपरराष्ट्र मंत्री अब्दुल रेहमान मोहम्मद फकीर यांनी भारत आणि इंडोनेशियामधील राजकीय संबंधांना ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम दोन्ही देशांनी संयुक्तपणे राबवला.

Leave a Comment