साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

sadhavi-pragya
मुंबई – एनआयए न्यायालयाकडून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला दिलासा मिळाला असून न्यायालयात साध्वीला निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने या संदर्भातील निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सध्या भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर साध्वी प्रज्ञासिंह लोकसभा निवडणूक लढवत आहे. साध्वीच्या विरोधात मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या एका मुलाच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली होती. निवडणूक लढविण्यास साध्वीला परवानगी देऊ नये व तिचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

भाजपने भोपाळमधून मालेगाव स्फोटात आरोपी असलेल्या व सध्या जामीनावर असलेल्या साध्वीला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून भोपाळमध्ये ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात साध्वीच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. दिग्विजय हे नेहमी हिंदू आतंकवाद असल्याचे वक्तव्य केले आहे आणि भाजपने प्रखर हिंदुवादी साध्वीला उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment