जपानी निवडणुकीत पुणेकर पुराणिकांचा डंका

yogendra
भारतात सध्या लोकसभेसाठी मतदान सुरु आहे आणि पुण्यात २३ एप्रिलला लोकसभेसाठी मतदान झाले असताना जपानमधील कॉर्पोरेशन निवडणुकात पुणेकर योगेंद्र पुराणिक यांनी विजय मिळवून जपानी निवडणुकीत विजय मिळविणारे पहिले भारतीय असा डंका वाजविला आहे. ४१ वर्षीय योगेंद्र यांनी जपानचे नागरिकत्व घेतले आहे आणि ते तेथे योगी नावाने ओळखले जातात. टोक्यो मध्ये इडोगावा म्युनिसिपल कार्पोरेशन निवडणुकीत योगी यांनी अर्ज भरला होता आणि २१ एप्रिल रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत योगी ६४४७ मते मिळवून विजयी झाले आहेत.

योगी यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले घोषणापत्र मतदारांना फारच आवडले होते. त्यात पुरेशी पाळणाघरे, स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि मनोरंजनाची सुविधा आणि गैरस्थानिक मुलांना सरकारी शाळेत दाखला असे महत्वाचे मुद्दे होते. योगी कॉन्स्टीट्युशनल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्य आहेत आणि ही जपानमधील सर्वात मोठी पार्टी आहे. ते ज्या भागातून निवडणूक लढवीत होते तेथे ४५०० भारतीय आहेत. गेली १० वर्षे योगी जपानी राजकारणात सक्रीय आहेत. १९९७ मध्ये ते उच्चशिक्षणासाठी जपानला गेले आणि नंतर तेथेच अनेक आयटी कंपन्यातून त्यांनी काम केले. ते बँकर असून मिसुहो बँकेतून निवृत्त झाले आहेत.

puranik
गेली २० वर्षे ते जपान मध्येच असून त्यातील १५ वर्षे ते इडोगावा मध्ये वास्तव्यास आहेत. योगी यांनी जपान मध्ये रेल्वेस्टेशन, चौकाचौकातून प्रचार सभा घेतल्या. जपान आणि भारत यातील राजकीय क्षेत्रातील फरक सांगताना ते म्हणाले, जपानी राजकारणी आणि अन्य नागरिक शिस्तीला महत्व देणारे, नियमांचे काटेखोर पालन करणारे आहेत आणि अतिशय सभ्यतेने राजकारण करणारे आहेत. एकच दोष म्हणजे येथे पेपरवर्क खूप आहे. योगी यांनी पुढील निवडणुकीत मेयर पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पुण्याचेच पण सध्या जपानमध्ये फिडेल टेक्नोलॉजीचे प्रेसिडेंट असलेले सुनील कुलकर्णी यांनी योगेंद्र यांच्या यशाबद्दल बोलताना हा ऐतिहासिक क्षण असल्याचे आणि जपानी स्थानिक राजकारणात एक पुणेकर कार्यरत असल्याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले.

Leave a Comment