सनी देओलचा भाजपमध्ये प्रवेश

sunny-deol
नवी दिल्ली – संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपच्या तिकीटावर पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा व सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पंजाबमधून भाजपतर्फे त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप त्याला त्याची राष्ट्रवादी व देशभक्ताची प्रतिमा पाहून पंजाबमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो. तथापि, त्याच्याकडून निवडणूक लढवण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाही; परंतु भाजप अध्यक्ष अमित शहा व सनी यांची नव्याने झालेली भेट पाहता या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही, असे दिसते.

सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपशी जोडले गेलेले आहेत. त्यांनी 2004 मध्ये भाजपच्या तिकिटावर राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी स्वत: ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु मागील काही दिवसांपासून ते मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी निवडणूक प्रचार करीत आहेत, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम त्यांचे पुत्र सनी देओलवरही होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment