साध्वी प्रज्ञा सिंह यांचा नवा जावई शोध, म्हणतात गोमूत्रामुळे बरा होतो कॅन्सर

sadhavi-pragya
भोपाळ : आता एका दाव्यामुळे भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यावर शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर जोरदार टीका झाली. त्यांनी त्यानंतर आपले वक्तव्य मागे घेतले. साध्वींनी या वक्तव्यानंतर मौन बाळगले होते. पण आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी त्यांचे मौन सोडले आहे.

हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाब आणि कॅन्सरवर एक इलाज साध्वींनी सांगितला आहे. हे आजार गोमूत्र प्राशन केल्यामुळे बरे होतात, असे त्यांनी म्हटले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांचा हा चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रज्ञासिंह यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना असाच आणखी एक दावा केला आहे. गायीच्या पाठीवरून हात फिरवला की रक्तदाबाचा आजार बरा होतो. गायीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तरी रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

मालेगाव स्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह या प्रमुख आरोपी आहेत. 9 वर्षं या प्रकरणी तुरुंगात राहिल्यानंतर तब्येतीच्या कारणामुळे त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनाही कॅन्सर झाला होता आणि आपल्या कॅन्सरवरही आपणच इलाज केला, असेही सांगायला साध्वी विसरल्या नाहीत.

सोमवारी 22 एप्रिलला साध्वींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच आपली संपत्तीही जाहीर केली. आपले स्वत:चे असे काही उत्पन्न नाही, पण भिक्षा आणि समाजातून मिळणारी मदत यावरच माझा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या माध्यमातून आपल्याकडे 4 लाख 44 हजार 224 रुपयांची स्थायी आणि अस्थायी संपत्ती आहे, असेही त्यांनी जाहीर केले. यामध्ये 2 लाख 54 हजार 400 रुपयांचे दागिनेही आहेत. साध्वी प्रज्ञासिंह या भोपाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

Leave a Comment