मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट

shivsena
पुसद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध पुसदच्या न्यायालयाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवून, मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केला आहे. आरोपी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

न्यायालयात तारखेला सदर प्रकरणातील आरोपी समन्स बजावूनही हजर राहिले नाहीत. हे प्रकरण लांबवण्याच्या हेतून जाणून-बुजून गैरहजर राहत असल्यामुळे आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात यावे, असे पुसद न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले होते.

मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मूक मोर्चे काढले होते. अत्यंत शांततेत, अहिंसात्मक पद्धतीने एकामागोमाग एक राज्यभर मराठा समाजाने मोर्चे काढले होते. मराठा समाजाच्या मूक मोर्चांचे अनेक संघटनांनी, समाजांनी, राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. प्रसंगी पाठिंबाही दिला होता. पण मराठा समाजाच्या या मूक मोर्चांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून खिल्ली उडवण्यात आली होती.

‘सामना’त मराठा समाजाच्या मूक मोर्चादरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रातून, या मोर्चांना ‘मूका मोर्चा’ म्हणण्यात आले होते. शिवेसना आणि त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’विरोधात या व्यंगचित्रानंतर मराठा समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. शिवसेनेकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली होती. पण संतप्त आणि नाराज मराठा समाजातील व्यक्तींनी ठिकठिकाणी ‘सामना’विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या.

Leave a Comment