जगात २.३ कोटी लोकांचा १२३४५६ हाच एक पासवर्ड

password
पासवर्ड हॅक करून सायबर गुन्हे करण्याचे प्रमाण जगभरात वाढत चालले असल्याचे दिसून येत असले आणि पासवर्ड सुरक्षा महत्व पटवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागृती केली जात असतानाही ब्रिटनच्या नॅशनल सायास्न रिसर्च सेंटरने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेक्षणात जगात २ कोटी ३० लाख लोक अजूनही १२३४५६ हाच पासवर्ड वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पासवर्ड सुरक्षित असावा यासाठी केल्या जात असलेल्या जागृतीचा प्रत्यक्षात किती उपयोग होतो आहे हे तपासण्यासाठी हे सर्व्हेक्षण केले गेले. त्यात जागृतीचे सातत्याने प्रयत्न करूनही युजर लक्षात ठेवायला सोपे, सहज वापरले जाणारे पासवर्डच निवडतात असे दिसून आले आहे.

या संस्थेचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. इयान लेवी म्हणाले युजर सोपे पासवर्ड निवडून स्वतः हॅकर्सचे सावज बनत आहेत. आपली माहिती सुरक्षित राहावी यासाठी सोपा पासवर्ड निवडणे योग्य नाही. आपल्या नावाचा पहिला शब्द, स्थानिक फुटबॉल टीमचे नाव, आवडता ब्रांड पासवर्ड म्हणून निवडण्याचे प्रमाण मोठे आहे. १२३४५६ नंतर १२३४५६७८९ हा दुसरा असाच सर्वाधिक वापरला जात असलेला पासवर्ड आहे. सहज हॅक करता येणाऱ्या टॉप पाच पासवर्डमध्ये QWERTY हा शब्द, ११११११ हा आकडा, फुटबॉल टीम लिव्हरपूल अनेकांनी निवडला आहे. त्यापाठोपाठ चेल्सी टीमचे नाव निवडले गेले आहे. संगीताशी संबंधित शब्दात ब्लिंक १८२ सर्वाधिक युजरनी निवडला आहे.

या सर्व्हेक्षणात पासवर्ड हॅक झाला तर पैसे चोरी होण्याची भीती वाटणारे युजर ४२ टक्के आहेत तर १५ टक्के युजरना त्यांचा पासवर्ड अतिशय सुरक्षित आहे अशी भावना असल्याचेही दिसून आले आहे.

Leave a Comment