महात्मा गांधींची हत्या करणारा संघ काँग्रेसची पैदास - अबू आझमी - Majha Paper

महात्मा गांधींची हत्या करणारा संघ काँग्रेसची पैदास – अबू आझमी

abu-azami
ठाणे – महात्मा गांधींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हत्या केली. काँग्रेसचे नेते ही हत्या त्यावेळी थांबवू शकले नाहीत. संघ तर काँग्रेसचीच पैदास असून काँग्रेस आजही त्यांच्याच ताब्यात असल्याचे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी भिवंडीतील एका जाहीर सभेत केले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी २०१४च्या निवडणुकीतील प्रचार सभेत संघवाल्यांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचे वक्तव्य केले होते. भिवंडीतील संघाचे कार्यवाहक राजेश कुंटे यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत, त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. अद्यापही भिवंडी न्यायालयात त्या दाव्याची सुनावणी सुरु असतानाच महात्मा गांधींची हत्या आरएसएसने केल्याचे वक्तव्य आमदार अबू आझमी यांनी केल्यामुळे पुन्हा भिवंडी लोकसभा मतदार संघात खळबळ उडाली आहे.

भिवंडीतील दिवानशा दर्गा येथे भिवंडी लोकसभा निवडणूकीत सपा-बसपा युतीचे उमेदवार डॉ. नुरुद्दीन अन्सारी यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अबू आझमी यांनी त्यावेळी खळबळजनक वक्तव्य केले. आझमी पुढे म्हणाले की, काँग्रेस देशभर मतांची विभागणी करून भाजपला जिंकविण्याचे काम करीत असल्यामुळे खरे वोट कटवा काँग्रेस असून हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, असे आरोप त्यांनी प्रचार सभेत केले. पण भाजप विरोधात सभेदरम्यान त्यांनी अधिक बोलणं टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संघाचा जन्म काँग्रेस पक्षाने केल्यामुळे त्यांच्याच बोलण्यावरून आताची काँग्रेस कार्य करीत असून समाजवादी विचारांच्या पक्षाने काँग्रेसला लगाम घालण्याचे काम केले असल्याचे सांगत, काँग्रेस उत्तरप्रदेश, दिल्ली , पश्चिम बंगाल यांसह अनेक राज्यात तेथील निधर्मी पक्षांची मते खाण्यासाठी उभी असल्याने खरे वोट कटवाची भूमिका काँग्रेस वाढवीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Leave a Comment