पाहा ‘बिग बॉस मराठी’चा पहिला प्रोमो

bigg-boss
कलर्स मराठी ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या यशस्वी सीझननंतर आता बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन येत आहे. ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने जिंकली. असे सर्वांचे आवडते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी सीझन – २’ चे सूत्रसंचालन करणार आहेत. नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना महेश मांजरेकर दिसले होते. प्रेक्षकांच्या भेटीला आता हा प्रोमो आला आहे.

या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले आहेत. ‘मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे हे कवी मनाचे नेते, होतील का बिग बॉसचे विजेते, असा प्रश्न बिग बॉसच्या प्रोमोमधुन महेश मांजरेकर विचारताना दिसत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात कोणत्या स्पर्धकांची वर्णी लागणार आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


या वेळेस ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील, याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. काही नावांची एव्हाना चर्चा सुरू झाली असली तरीही अजून त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

लोकसभा निवडणुकांमुळे सध्या सगळा माहोल बदलून गेला आहे. अशात फक्त मांजरेकर प्रोमोसाठी नेत्याच्या वेशभूषेत दिसतात की, सीझन होस्ट करताना हाच लूक कॅरी करतात याचीही उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरात ९० दिवस कोणतेही राजकारण न करता टिकायचे म्हणजे काही साधी गोष्ट नाही. त्यामुळेच मांजरेकर यांचा हा नवा लूक बिग बॉसच्या घरात त्यांचीच सत्ता असणार, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे.

Leave a Comment