पहिल्याच दर्शनाने प्रेमात पाडणारे धेमाजी

dhemaji
आसाम हे मुळातच निसर्गाने नटलेले राज्य. या राज्यात अरुणाचल सीमेजवळ वसलेले ऐतिहासिक आणि प्राचीन धेमाजी पर्यटकांना पहिल्याच दर्शनाने प्रेमात पडणारे स्थळ आहे. चोहोबाजूने दिसणारी हिरवीगार लुसलुशीत भात शेते, भाताचा दरवळणारा विशिष्ट सुगंध तर रब्बी हंगामात गेलात तर पिवळ्या सुंदर फुलांनी मोहरलेली सरसो म्हणजे मोहरीची शेते तुम्हाला सर्व चिंता, त्रास विसरायला लावतील. येथील प्राचीन कला संस्कृती व आधुनिकता यांचा संगम मनाला मोह घालतो आणि नव्या जुन्याची येथे जशी एकरूपता आहे ती अन्यत्र दिसणे कठीण. विशेषत विवाह उत्सवात ती ठळकपणे जाणवते.

bihu
येथील विवाहात परंपरेने चालत आलेल्या अनेक रूढी आहेत पण स्त्री पुरुष बरोबरी, स्त्री स्वतंत्रतेसंबंधी नवी मुल्ये तितक्याच आत्मीयतेने स्वीकारलेली पाहायला मिळतात. पानांनी रंगलेल्या ओठांनी बिहू नृत्य करणारी वृद्धा आणि तिला सहज बासरीची साथ करणारा शेतात काम करणारा तरुण हे कधीही आढळणारे दृश्य. ब्राह्पुत्र नदीच्या उत्तरेला असलेले हे ठिकाण आणि येथील सौदर्य वर्णनापलीकडेचे आहे. त्याला हिमालयाच्या बर्फाळ शिखरांनी आणखी नटविले आहे.

हिमालय आणि ब्रह्मपुत्रा नदी यांच्यामुळे येथे विविध प्रकारच्या वनस्पती उगवतात. या ठिकाणाला इतिहास आहे. १२ व्या शतकात अहोम राजानी या ठिकाणी त्यांची राजधानी वसविली मात्र पुराचे पाणी सतत येत राहिल्याने ती दुसरीकडे नेली. नंत चुतीया रजनी येथे अनेक वर्षे राज्य केले. या प्राचीन इतिहासाबरोबर १९६२चे भारत चीन युध्द, २००४ मधले उल्फा दहशतवाद्यांनी केलेले बॉम्बस्फोट असा इतिहास धेमाजी जिल्ह्याला आहे.

bogipul
या भागात मिसिंग, सोनोवाल कचारी, देओरी, लालुंग या जमातीचे लोक मूळ रहिवासी आहेत. त्यामुळे येथील संस्कृतीत विविधता आहे. तीच विविधता उत्सव, रूढी, कपडा, राहणे, खाणे आणि भाषेत दिसून येते. येथील स्त्रिया अतिशय कुशल विणकर आहेत, त्यांचे नैसर्गिक रंगाचे ज्ञान अतिशय वरचे असून कपडा विणण्यासाठी त्या स्वतः शेतात कापूस पिकवून त्याचा धागा काढून कपडा विणतात. बालपणापासून येथे मुलीना कपडा विणण्याचे शिक्षण आई देते. येथील उत्सवात आसामी झलक दिसते. मुख्य सण बिहू. तो तीन प्रकाराने तीन वेगळ्या वेळी सादर होतो.

हे ठिकाण आता अधिक प्रसिद्धीस आले ते तेथे उभारल्या गेलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या रेल्वे पुलामुळे. बोगीबील हा ४.६ किमी लांबीच्या रेल्वेपुले येथे उभारला गेला असून त्यावर तीन पदरी रस्ता बांधला गेला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचे ते मोठे आकर्षण बनले आहे. या भागात भेट देण्यासाठी थंडीचा सिझन अधिक चांगला असतो.

Leave a Comment