मुकेश अंबानी देणार जेटच्या पंखाना ताकद

jetair
गेली २६ वर्षे भारतीय हवाई क्षेत्रात कार्यरत असलेल्या जेट एअरवेज विमानांचे पंख बुधवारी जमिनीवर स्थिरावले आहेत मात्र या पंखात ताकद भरण्याचे काम रिलायंसचे सर्वेसर्वा आणि देशातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी करणार असल्याचे वृत्त आहे. जेट एअरवेज पुन्हा सुरु व्हावी यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत मात्र ८ हजार कोटींचे कर्ज आणि कंपनी पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक असेलेले ४०० कोटी देण्यास बँकांनी स्पष्ट नकार दिल्याने सध्या तरी जेट विमाने जमिनीवरच आहेत. रिलायंसने एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (इओआय) मुदतीत सादर केलेले नाही मात्र अंबानी एतिहाद एअरवेजच्या माध्यमातून जेट मधील हिस्सेदारी खरेदी करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

एतिहादची जेट मध्ये सध्या २४ टक्के भागीदारी आहे आणि त्यांनी इओआय सादर केला आहे. याच मार्गाने मुकेश अंबानी जेट मधील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. हवाई वाहतूक नियमावलीनुसार ४९ टक्के हिस्सा घेण्यासाठी एतिहादला अन्य वेगळ्या परवानगीची गरज नाही मात्र त्यापेक्षा जास्त हिस्सेदारी खरेदी करायची असेल तर सरकारची मंजुरी घ्यावी लागेल.

मिडिया रिपोर्टनुसार रिलायंसमधील एका अधिकाऱ्याने अफवांवर विश्वास ठेऊ नये असे सांगताना रिलायंस जेट हिस्सेदारीसाठी विचार करत असल्याचे मान्य केले. अर्थात हा सौदा जमला तर रिलायंस त्यासंदर्भात घोषणा करेल असेही हे अधिकारी म्हणाले. दरम्यान जेट ने हिस्सेदारी खरेदीसाठी रतन टाटा यानाही विनंती केली आहे असे सांगितले जात असून एअर इंडियाने जेटची विमाने भाडेपट्टीवर घेण्यासाठी बोलणी केली असल्याचेही समजते.

Leave a Comment