खेळाच्या मैदानातून राजकीय रिंगणात उतरलेले क्रीडापटू

bhutia
बॉलीवूड मधील अनेक कलाकार त्या क्षेत्रातून राजकारांत प्रवेश करते झाल्याचे नेहमीच दिसले आहे. मात्र गेल्या १० वर्षात खेळाच्या मैदानातून राजकीय रिंगणात उतरलेल्या क्रीडापटूंची संख्या वाढत चालली असून आता स्पोर्ट्स जगतालाही राजकारण खुणावू लागले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या १० वर्षात अनेक खेळाडू राजकारणात आले आहेत त्यातील काही यशस्वी झालेत, काही चीतपट झालेत तर काहींचे भवितव्य अजून ठरायचे आहे.

ऑलिम्पिकसाठी खेळलेल्या भारताचा पैलवान सुशीलकुमार याने नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असून तो पश्चिम दिल्लीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. तो तेथे भाजप आणि आपच्या उमेदवाराशी दोन हात करणार आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाजपामध्ये नुकताच प्रवेश केला आहे. देशविरोधी वक्तव्ये करणार्यांना गौतम नेहमीच सोशल मिडियावरून सडेतोड उत्तरे देताना दिसतो. बायचुंग भुतिया भारताचा स्टार फुटबॉल खेळाडू. मुळचा सिक्कीमचा असलेल्या भुतिया तृणमूल कॉंग्रेसकडून बंगाल मधून दोन वेळा निवडणूक लढला आहे.

rajya
ऑलिम्पिक निशाणेबाज आणि माजी लष्करी अधिकारी राजवर्धनसिंग राठोड यांनी २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिक मध्ये देशाचे नाव उज्वल केले. लष्करातून निवृत्ती घेऊन ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले आणि केंद्रात क्रीडा मंत्री म्हणून कार्यरत आहेत. आयपीएल फिक्सिंग प्रकरणात अडकलेला क्रिकेटपटू श्रीसंत याने भाजपचे सदस्यत्व घेऊन केरळ तिरुवनंतपुरम येथून विधानसभा निवडणूक लढविली मात्र त्याला पराभव पत्करावा लागला. आता त्यांची अवस्था ना क्रिकेट ना राजकारण अशी झाली आहे.

azar
क्रिकेटचा भगवान सचिन तेंडूलकर २०१३ मध्ये राज्यसभेचा खासदार झाला आहे. मात्र तो सक्रीय राजकारणापासून दूर आहे. २०१४ मध्ये कॉंग्रेसने त्याला लोकसभेसाठी तिकीट देऊ केले होते मात्र त्याने निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्याची राज्यसभेतील कामगिरी समाधानकारक नाही त्यामुळे त्याला टीकेला तोंड द्यावे लागले होते. मोहम्मद अझरूद्दीन याने २००९ मध्ये कॉंग्रेस मध्ये प्रवेश करून मोरादाबाद येथून लोकसभा निवडणूक लढविली आणि तो निवडून आला मात्र २०१४ साली त्याला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. सचिनचा खास मित्र क्रिकेटपटू विनोद कांबळी याने राजकरणात येण्याचा प्रयत्न केला आणि २००९ मध्ये लोकभारती पार्टीतर्फे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढविली. पण त्याला पराभवास सामोरे जावे लागले.

puniia
क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यालाही राजकारण म्हणावे तसे मानविले नाही आणि क्रिकेटमध्येही त्याचे म्हणावे तसे बस्तान बसले नाही. त्याने कॉंग्रेसच्या तिकिटावर २०१४ मध्ये उत्तर प्रदेशातील फुलपूर सीटवरून निवडणूक लढविली मात्र तो विजयी होऊ शकला नाही. डिस्कथ्रो मध्ये गोल्ड मेडलची कमाई करणारी कृष्णा पुनिया राजस्थानच्या मादुलपूर सीटवरून कॉंग्रेस आमदार बनली आहे. तिने खेळानंतर राजकारणात करियर करण्याचे ठरविले आहे.

Leave a Comment