साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य हे खूप चुकीचे आणि लोकशाहीसाठी घातक

ujjwal-nikam
भंडारा – विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भंडारा येथे माध्यमांशी संवाद साधताना साध्वी प्रज्ञा सिंह यांचे करकरे यांच्याबाबतचे वक्तव्य म्हणजे वीरमरण आलेल्यांचा अपमान असल्याचे म्हटले असून लोकशाहीला अशा प्रकारचे बोलणे घातक आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापूर्वी राजकारण्यांनी आपल्या जिभेला टाळे लावावे, असेही निकम म्हणाले.

हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझे सुतक संपवले, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. २६/११ चा मुंबई हल्ला हा देशाविरुद्ध होता, सर्वोच्च न्यायालयाने देखील ही बाब मान्य केली आहे. न्यायालयासमोर या हल्ल्यातील मुख्य आरोपी पाकिस्तानी अजमल कसाबनेही कबुली दिली होती, की करकरे, साळसकर, कामटे हे तो आणि त्याच्या साथीदार इस्माईलने केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडले होते. मात्र, तरीही आज काही राजकारणी व्यक्ती यावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही निकम यांनी यावेळी केला.

आताही मुंबईच्या २६/११ हल्ल्यावरून राजकारण होत असून हे वाईट आहे. आपल्या संस्कृतीत मरणाऱ्या व्यक्तीसंदर्भात वाईट बोलले जात नाही आणि तरीही काही राजकारणी यावर अशा पद्धतीने भाष्य करीत आहेत, हे खूप चुकीचे आणि लोकशाहीसाठी घातक असल्याचेही निकम म्हणाले.

Leave a Comment