पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात सभा घेण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी दिली असल्याचा घणाघात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे. राज ठाकरेंना राष्ट्रवादीने दिलेली सुपारी जमिनी किंवा पैशांच्या स्वरुपात नसून ती विधानसभेच्या 25 जागांची असल्याचा आरोप संजय काकडेंनी केला.
राज ठाकरेंना भाषणबाजीसाठी राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या 25 जागांची ऑफर : काकडे
महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शाहांची पुण्यातील भिगवणमध्ये सभा पार पडली, संजय काकडेंनी यावेळी राज ठाकरेंवर निशाणा साधला. इतका धसका या लोकांना बसला आहे, की भाड्याने आणि सुपारी देणे यांनी सुरु केले आहे, अमित भाई. ही सुपारी राज ठाकरे नावाच्या व्यक्तीला दिली आहे. सुपारी देणे म्हणजे पैसे देणे, जाग देणे… तर यांनी नवीन सुपारी दिली, तुझे 25 सभासद आम्ही विधानसभेवर पाठवू. तुझ्यासोबत युती करु, 25 ते 30 जागा तुला विधानसभेच्या देऊ, असे आमिष राष्ट्रवादीने राज ठाकरेंना दिल्याचा दावा संजय काकडेंनी केला.
तो आपल्या मोदीसाहेबांबद्दल, अमित शाहांबद्दल वायफळ बोलतो. जो व्यक्ती बोलत आहे, त्याचा एकही खासदार ना, एकही आमदार आहे, मुंबईत एक नगरसेवक, पुण्यात दोन नगरसेवक, नाशिकला चार नगरसेवक. ज्यांना स्वतःचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत, आपले उमेदवार ते काय पाडणार?’ असा सवाल करत संजय काकडेंनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली.