वेंडिंग मशीन कार्स विक्रीतून बापलेक झाले अब्जाधीश

carvana
अमेरिकेत कारवाना या जुन्या कार्स विक्री खरेदी व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे मालक अर्नेस्ट गार्सिया द्वितीय आणि त्यांचा मुलगा अर्नेस्ट गार्सिया तृतीय हे बापलेक अब्जाधीश बनले आहेत. विशेष म्हणजे ते वेंडिंग मशीनच्या माध्यमातून जुन्या कार्स विक्री करतात आणि अशी १६ मशीन्स त्यांनी अमेरिकेत ठीकठिकाणी बसविली आहेत. ही कंपनी जुनी कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आर्थिक मदत पुरविते.

सगळ्यात नवल म्हणजे ही कंपनी सुरु करून ५ वर्षेच झाली आहेत आणि आत्तापर्यंत तरी ती तोट्यातच चालली आहे. आणखी काही वर्षेही तो तोट्यातच चालेल असा अंदाज आहे तरीही मालक पितापुत्र मात्र अब्जाधीश बनले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स नुसार त्यांची संपत्ती ४७ हजार कोटी रुपये आहे. वडील अर्नेस्ट द्वितीय काही वर्षापूर्वी झालेल्या घोटाळ्यात दोषी ठरले होते पण त्यांनी सरकारी साक्षीदार होण्याचे कबुल केल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले नाही. नंतर त्यांनी जुन्या कार्स विक्रीचा व्यवसाय सुरु केला आणि २०१३ साली हा व्यावसाय वेंडिंग मशीनच्या मदतीने सुरु केला. ही कंपनी २०१७ साली लिस्ट झाली आहे.

गेल्या चार वर्षात या कंपनीचा महसूल दुप्पट झाला आहे आणि विक्री वाढली आहे. या कंपनीच्या शेअर या काळात ७० डॉलर्सवर गेला पण अल्पावधीत कंपनीचा तोटा वाढतोय हे उघड झाल्यावर ३० डॉलरवर घसरला. आता तो पुन्हा ६५ डॉलर्सवर गेला आहे. या कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या म्हणण्याप्रमाणे आणखी १० वर्षात लोकांची कार खरेदीची पद्धत बदलेल. त्यावेळी ऑनलाईन आणि वेंडिंग मशीन मधून कार खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असेल आणि ही वेळ येईल तेव्हा गार्सिया जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत अग्रस्थानी असेल.

Leave a Comment