…म्हणून ‘त्या’ व्यक्तीने हार्दिक पटेलांचे थोबाड रंगवले

hardik-patel1
अहमदाबाद: शुक्रवारी गुजरातमधील एका प्रचारसभेत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना एका व्यक्तीने श्रीमुखात लगावली. हार्दिक पटेल सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत भाषण करत असताना हा प्रकार घडला. तरुण गुज्जर नावाची व्यक्ती यावेळी स्टेजवर आली आणि हार्दिक यांच्या त्याने कानशिलात लगावल्यानंतर स्टेजवरील कार्यकर्त्यांनी तरुणला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी अवस्थेतील तरुणला पोलिसांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. तरुण गुज्जरने हार्दिकला मारहाण करण्यामागचे खरे कारण तेव्हा सांगितले.

तरुणने म्हटले की, माझी पत्नी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे आंदोलन सुरु असताना गरोदर होती. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. पण पाटीदार आंदोलन त्यावेळी पेटल्यामुळे आम्हाला बराच त्रास सहन करावा लागला. मी त्यावेळीच काहीही करून हार्दिक पटेलला धडा शिकवायचे ठरवले होते. यानंतर माझा मुलगा हार्दिक यांच्या अहमदाबाद रॅलीच्यावेळीही आजारी होता. औषधे आणण्यासाठी मी दुकानात गेलो. पण सर्वकाही रॅलीमुळे बंद होते. संपूर्ण गुजरात हार्दिक पटेल यांच्यामुळे बंद झाला होता. हार्दिक पटेल हिटलर आहेत का, असा सवालही तरुण गुज्जर यांनी विचारला.

तरुण गुज्जर कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. जामनगरमधून निवडणूक लढवण्याची हार्दिक पटेल यांना इच्छा होती. परंतु, न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका खटल्यामुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज वेळेत दाखल करता आला नव्हता.

Leave a Comment