राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ गुगल ट्रेण्डसवर पहिल्या क्रमांकावर

raj-thakre
मुंबई – गुरुवारी पुण्यात झालेल्या सभेमध्ये देशभरात माझी भाषणे पाहिली जातात याचा आनंद वाटतो असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. राज्यातील राजकीय वातावरण मागील आठवड्याभरापासून ढवळून काढणाऱ्या राज यांचा बोलबाला केवळ प्रचारसभांमध्येच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही दिसून येत आहे.

गुगलवर ‘Raj Thackeray’ हे दोन शब्द सर्च करणाऱ्यांचे प्रमाण मागील सात दिवसांमध्ये अनेक पटींनी वाढल्याचे गुगलच ट्रेण्डसमध्ये दिसत आहे. राज यांनी गुगलवर सर्च होण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही प्रचंड फरकाने मागे टाकल्यामुळे नेटीझन्सचा ओढा पुन्हा एकदा अन्य नेत्यांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या राज ठाकरेंच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरेंनी आपल्या दौऱ्याला नांदेड येथील १२ एप्रिलच्या सभेपासून सुरुवात केली. गुगलवर याच तारखेपासून राज ठाकरे सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. राज ठाकरेंनी ६ एप्रिल रोजी झालेल्या पाडव्याच्या सभेमध्ये आपण मोदी आणि शाह यांच्याविरोधात राज्यभरात सभा घेणार असल्याचे जाहीर केले. राज ठाकरे यांच्याबद्दल या दिवशी सर्वाधिक सर्च झाल्याचे गुगल ट्रेण्डमध्ये दिसत आहे. त्यानंतर सहा दिवसांनी म्हणजेच १२ एप्रिलपासून राज यांच्या दौऱ्याची सुरुवात झाल्यानंतर राज यांच्या नावाने गुगल सर्च करणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. मागील सात दिवसांपासून सभेच्या दिवशी राज यांच्याबद्दल गुगल सर्च करण्याचा ट्रेण्डच दिसत आहे.

महाराष्ट्रातून राज ठाकरे यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च केले जाते. त्या खालोखाल गोवा, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंड या राज्यांच्या क्रमांक सर्वाधिक वेळा राज ठाकरे सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत लागतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश राज्य ही भाजपची सत्ता असणारी राज्ये आहेत. ज्या ज्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या सभा होत आहेत त्या शहरांच्या नावांने गुगल सर्च करण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे. राज यांच्यासंदर्भात सर्च करताना सर्च करण्यात नांदेड, सोलापूर, शिवाजी पार्क, इचलकरंजी या शहरांची नावे आल्याचे गुगल ट्रेण्डसमध्ये दिसून येते.

या दौऱ्यातील राज ठाकरे यांचे सर्वाधिक गाजलेले वाक्य म्हणजे ‘लाव रे तो व्हिडिओ’. राज ठाकरे यांच्यासंदर्भात सर्च करताना हे वाक्य सर्च करणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसत आहे. रिलेटेड क्वेरी म्हणजेच राज ठाकरेंच्या नावाबरोबर सर्वाधिक सर्च होणारे शब्दांमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ पहिल्या क्रमांकावर आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment