लग्न कोणाचे आणि ते नाचत आहेत कोणासाठी ? प्रकाश आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

prakash-ambedkar
नगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांवरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या सभा म्हणजे, लग्न कोणाचे हे नाचतंय कोणासाठी ? असा थेट सवाल विचारला आहे. निवडणुकांच्या रिंगणात मनसेचा एकही उमेदवार नाही. मग, कोणासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

राज ठाकरेंच्या सभा आणि भूमिकेबद्दल अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आला होता. आंबेडकर यांनी त्यावर, बोलताना राज ठाकरेंवर कडक शब्दात टीका केली. लग्न आपल्या घरातले नाही, मग ते कोणासाठी नाचत आहेत हेच मला कळत नाही. आपल्या स्वत:च्या घरातले लग्न म्हटले मग आनंद आहे म्हणून आपण नाचतो. आता, ते आपल्या घरात लग्न नाही. मग, ते कोणासाठी नाचत आहेत, हे तर त्यांनी सांगावे? अशा शब्दात प्रकाश आंबडेकरांनी राज ठाकरेंच्या सभांचा समाचार घेतला आहे.

राज ठाकरेंचे लाव रे तो व्हिडीओ हे वाक्य सोशल मिडीयावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. तसेच, आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. मोदीजी तुम्ही स्वत:ला मागासवर्गीय म्हणता, मग त्यांच्यासाठी काय केले ते सांगा शिवाय स्वत:चे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढून जाहीर करावे, म्हणजे सर्वांना कळेल की तुम्ही मागासवर्गीय आहात की नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Leave a Comment