माझ्या नावाचा वापर करून होत आहे बीडमधील मतदारांची दिशाभूल : उदयनराजे

udyanraje-bhosale
सातारा – माझ्या नावाचा वापर करून बीड लोकसभा मतदारसंघातील मतदारांची दिशाभूल केली जात असून साताऱ्याचे खासदार आणि उमेदवार उदयनराजे भोसले यांनी या प्रकाराला बळी न जाता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करणारे प्रसिध्दीपत्रक काढले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा बीड लोकसभा मतदारसंघात वापर करत प्रितम मुंडे यांना पाठींबा देणारे बॅनर लावले आहे. उदयनराजे भोसले यांनी यावर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. एक प्रसिध्दीपत्रक काढून याच्याशी काही संबंध नाही असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे. स्वतः मी सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचा उमेदवार असल्यामुळे मतदारांची दिशाभूल माझ्या नावाचा वापर करून केली जात आहे.

लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात असून प्रचाराच्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष, उमेदवारांनी आपली भूमिका मांडली आहे. या निवडणूकीचे महत्त्व व देशासमोरील प्रश्न पाहता शेती – शेतकरी, बेरोजगार तरुण, छोटे व्यावसायिक, उद्योजक, महिला, दलित, वंचित वर्गासाठी भाजप सेना सरकारने देशाची व राज्यात सत्ता असतानाही कार्यक्रम राबवले नाहीत. त्यासंदर्भात आपण काय केले हे सांगण्यासारखे नसल्याने सैन्य दलाच्या शौर्याचा मुद्दा पुढे करून मते मागणे सुरु आहे असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

Leave a Comment