मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत लोक मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सींचा यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यादरम्यान टॅक्सी चालकांकडून अनेकदा जवळचे भाडे असल्याने नाकारण्यात येते. अनेक प्रवाशांची यामुळे गैरसोय होते. पण आता मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) च्या कारवाईला जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांना सामोरे जावे लागणार आहे.
टॅक्सी चालकांचा जवळचे भाडे नाकारल्यास रद्द होणार परवाना
टॅक्सी चालक जवळचे भाडे म्हटल्यावर सर्रासपणे प्रवाशांना नकार देत असल्याचा अनुभव प्रत्येक मुंबईकराला रोज येतो. अनेकदा प्रवाशांचे यामुळे टॅक्सी चालकांसोबत वाद होतात. अनेक प्रवाशी यावरुन त्या टॅक्सी चालकाची आरटीओला तक्रार करतात. आरटीओ या तक्रारीनंतर त्यांच्यावर किरकोळ दंडात्मक कारवाई करते आणि त्यांना सोडून देते. पण अनेक टॅक्सी चालक त्यानंतरही जवळचे भाडे नाकारत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे जवळचे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.
टॅक्सी चालकाच्या नकारामुळे प्रवाशांना अनेकदा कामाच्या ठिकाणी, रुग्णालयात जाण्यासाठी विलंब होतो. यामुळे प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरी जावे लागते. त्यामुळे आरटीओने टॅक्सी चालकांच्या या मुजोरपणाला आळा घालण्यासाठीच ही भूमिका घेतली आहे.
आता सर्वसामान्यांना जवळचे भाडे नाकारणाऱ्या मुजोर टॅक्सीवाल्यांच्या विरोधात तक्रार करता येणार आहे. तुम्हाला यासाठी टॅक्सीचा नंबर किंवा त्याचा बिल्ला नंबर असणे गरजेचे आहे. तुम्ही आरटीओच्या 1800-220-110 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करुन तक्रार दाखल करु शकता. त्या टॅक्सी-रिक्षा चालकांची यावरुन माहिती घेऊन आरटीओद्वारे कारवाई करण्यात येईल.
जर टॅक्सी किंवा रिक्षा चालकाकडून नागरिकांना जवळचे भाडं नाकारण्यात आले. तर तातडीने त्या टॅक्सी चालकाची तक्रार आरटीओने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर दाखल करणे आवश्यक आहे. त्यांचे परवाने ही तक्रार केल्यानंतर रद्द करण्यात येतील, असेही आरटीओने जाहीर केले आहे.