हे आहेत भारतातले करोडपती भिकारी

bhik
आपल्या देशात कुठलाही गर्दीचा रस्ता, चौक, मंदिरे, स्टेशन, बाजार अश्या परिसरात भिक मागणारे लोक दिसतात किंबहुना भिकारी ही आपल्या देशाची खास ओळख बनली आहे. मात्र देशातील काही भिकारी हा उद्योग भूक भागविणे यासाठी नाही तर व्यवसाय म्हणून करतात आणि ते नावालाच भिकारी आहेत. कारण प्रत्यक्षात ते करोडपती आहेत. त्यातील काही देशात चांगलेच प्रसिद्ध आहेत. अर्थात या करोडपती भिकारी संख्येत मायानगरी मुंबई आघाडीवर आहे.

gite
मुंबईच्या चर्नीरोड परिसरात सिटी टँक येथे भिक मागणारा कृष्णकुमार गीते रोज भिक मागून किमान १५०० रुपये मिळवितो. तो त्याच्या भावासह नालासोपारा येथे राहतो आणि त्याच्या मालकीचे घर आहे.

bharat-jain
दुसरा करोडपती भिकारी भारत जैन भिक मागून रोज २५०० रुपयांची कमाई करतो. त्याचे परळ येथे कोट्यावधी किमतीचे दोन अपार्टमेंट असून स्टेशनजवळ ज्यूसचे दुकान आहे. ते त्याने भाड्यावर दिले आहे. विशेष म्हणजे तो फाडफाड इंग्लिश बोलतो. दादर भागात भिक मागणारा मासू रोज आरामात किमान १ हजार रुपये मिळवितो. गेली चाळीस वर्षे तो हाच व्यवसाय करत आहे. त्याची ५० लाख रुपये किमतीची प्रॉपर्टी असून घरून तो रिक्षाने निघतो, रस्त्यात कपडे बदलतो आणि भिकेच्या कामाला लागतो. त्याचे कुटुंब असून त्यांना हा व्यवसाय केलेला आवडत नाही.

sambhaji
संभाजी काळे हा मुंबईच्या खार भागातला भिकारी. त्याचा विरार येथे फ्लॅट आहे, लाखो रुपये बँकेत आहेत आणि सोलापुरात जमीन आहे. त्याची स्वतःची दोन घरे आहेत. हाजी नावाचा आणखी एक भिकारी मुंबईत हा व्यवसाय करतो. वास्तविक त्याचा जरीचा कारखाना असून तेथे १०-१५ लोक कामाला आहेत. कुटुंबाला त्याचे भिक मागणे पसंत नाही पण त्यांच्या मते कमी कष्टात अधिक पैसे याच धंद्यात आहेत.

नोयडा सेक्टर १५ मध्ये मेट्रो स्टेशन वर सुनील सहानी भिक मागण्याचा व्यवसाय करतो. तो बिहारचा राहणारा आहे. २६ वर्षाचा हा तरुण या भागात फेमस आहे. तो म्हणतो, कारखान्यात कामाला जाऊन तुम्ही एका दिवसात जेवढे पैसे मिळविता त्यांचा कितीतरी अधिक मला येथे मिळतात. मेट्रोमधून रोज हजारो लोक प्रवास करतात त्यातील काही शेकडा लोकांनी भिक दिली तरी दिवसाला २ हजार रुपये मिळतात.

पटना येथील सर्वतीचा देवी नावाची भिकारीण अशीच प्रसिद्ध असून तिचे स्वतःचे घर आहे. भिक मागून मिळालेल्या पैशातून तिने सात तीर्थयात्रा आणि परदेश प्रवास केला आहे. ती वर्षाला ३६ हजार रूपये आयुर्विमा हप्ता भरते आणि मुलीचे लग्न तिने थाटामाटात केले आहे

Leave a Comment