योगी आदित्यनाथ यांची जातीयवादी ट्विट्स ट्विटरने हटवली

yogi-aaditynath
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने तीन दिवसांसाठी प्रचारात भाग घेण्यास बंदी घातल्याची कारवाई ताजी असतानाच आता योगींना ट्विटरने झटका दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुस्लीम लीगबाबत केलेले वादग्रस्त ट्विट हटवण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजप नेते गिरिराज सिंह, आमदार मनजिंदर सिंह सिरसा, अभिनेत्री कोयना मित्रा आणि माजी सैन्य अधिकारी सुरेंद्र पुनियाचे काही ट्विटही हटवण्यात आले आहेत.

ट्विटर इंडियाने जातीय टिपण्णी केलेली अशी ३४ ट्विट्स हटवली आहेत. एकतर हे ट्विट्स डिलिट करण्यात आले आहेत अथवा हे ट्विट भारतात दिसण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जातीयवादी आणि द्वेष निर्माण करणाऱी विधाने करणाऱ्यांवर कारवाई न केल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाने त्यानंतर सोमवारी योगी आदित्यनाथ यांच्यावर मंगळवारपासून ७२ तासांची प्रचारबंदी घातली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन मुस्लिम लीगला व्हायरस असे संबोधले होते. त्यांनी लिहीले होते की, मुस्लीम लीग असा व्हायरस आहे ज्याने कोणी संक्रमित झाले तर तो वाचू शकत नाही. आज तर याने प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच संक्रमित झाला आहे. विचार करा जर हे जिंकले तर काय होईल. संपूर्ण देशात हा व्हायरस पसरेल. योगींच्या या विधानापूर्वी असे सांगण्यात आले होते की, राहुल गांधींच्या रोड शोमध्ये मुस्लीम लीगचे झेंडे फडकावण्यात आले होते.

Leave a Comment