भोपाळ – बुधवारी भारतीय जनता पक्षात मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी सिंह प्रज्ञा ठाकूर यांनी प्रवेश केला. भोपाळमधून काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्या विरोधात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आज औपचारिकरीत्या भाजपमध्ये प्रज्ञा सिंह यांनी प्रवेश केल्याचे सांगितले. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
दिग्विजय सिंहांविरुद्ध निवडणूक लढवू शकतात साध्वी प्रज्ञा सिंह
दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा, असे सांगितले. बुधवारी सकाळी भोपाळमधील भाजप कार्यालयात त्या आल्या होत्या. भाजप नेते शिवराज सिंह चौहान, राम लाल आणि प्रभात झा हेही तेथे उपस्थित होते. साध्वींनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. १२ मे रोजी भोपाळच्या जागेसाठी मतदान होणार आहे.
भाजपला मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत पराभरावाचा सामना करावा लागला आहे. तरीही, भाजपची भोपाळ मतदारसंघावर पकड असल्याचे म्हटले जाते. येथे भाजपचे उमेदवार आलोक सांजर यांना २०१४ लोकसभा निवडणुकीत ७.१४ लाख मते मिळाली होती. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी होत्या. या प्रकरणात राष्ट्रीय तपास न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.