अंबाती रायुडूची निवड न झाल्याने आयसीसी देखील आश्चर्यात

ambati-raydu
मुंबई: दोनच दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अनेक खेळाडूंना विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होईल अशी अपेक्षा होती. त्यातीलच एक खेळाडू म्हणजे अंबाती रायुडू. सध्याचा रायुडूचा फॉर्म पाहता टीम इंडियात त्याची निवड होईल असा विश्वास अनेकांना होता. पण रायुडूचा 15 जणांच्या भारतीय संघात भारतीय निवड समितीने समावेश केला नाही.

अंबाती रायुडू निवड न झाल्याने नाराज झाला आहे. आपली खदखद रायुडूने ट्विटरवर व्यक्त केली आहे. विश्वचषक सामने पाहण्यासाठी आपण नुकताच 3D चष्म्याची ऑर्डर केली असल्याचे ट्विट रायुडूने केले आहे.

दुसरीकडे रायुडूचा टीम इंडियात समावेश न केल्याने आयसीसीनेही आश्चर्य व्यक्त केले आहे. तर रायुडूचे करिअरच संपल्याची शक्यता क्रिकेटतज्ज्ञ आणि समालोचक हर्षा भोगले यांनी वर्तवली आहे.


दरम्यान, 20 सामन्यातील भारतीय खेळाडूंची सरासरी आयसीसीने काढली आहे. यामध्ये विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मानंतर अंबाती रायुडूचा नंबर लागतो. रायुडू सरासरीत सचिनच्याही पुढे आहे. आयसीसीने हे आकडे शेअर करताना म्हटले आहे की, भारताच्या विश्वचषक संघातून रायुडूला वगळण्यात आले आहे. तुम्हाला वाटत नाही का त्याचा समावेश व्हायला हवा होता?”

दरम्यान, अंबाती रायुडूच्या करिअरबद्दलच समालोचक हर्षा भोगले यांनी शंका उपस्थित केली आहे. अंबाती रायुडूच्या फलंदाजीचे माजी कर्णधार सौरव गांगुलीसह अनेक खेळाडू कौतुक करतात, असे हर्षा भोगलेंचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, अंबाती रायुडूची भारतीय क्रिकेटमध्ये कहाणी वेगळीच आहे. रायुडू 2015 च्या विश्वचषकापूर्वी सर्व सामने खेळला, पण त्याचा वर्ल्डकपसाठीच्या संघात समावेश झाला नाही. आता 2019 मध्येही आशिया चषकापासून रायुडू भारतीय संघाकडून खेळत आहे. कर्णधार विराट कोहलीही रायुडू चौथ्या नंबरसाठी फिट असल्याचे म्हणतो. पण भारतीय संघात त्याला विश्वचषकासाठी स्थान मिळाले नाही. सध्या रायुडू 34-35 वर्षांचा असल्यामुळे त्याला आता विश्वचषकासाठी स्थान मिळणे कठीण आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी

Leave a Comment