मी तुरुंगात राहुनही बँकांचे कर्ज फेडेन – विजय माल्ल्या

vijay-mallya
नवी दिल्ली : जवळपास 9 हजार कोटी रुपयांचा देशातील बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्याने जेट एअरवेजला मदत मिळत नसल्याने दुःख व्यक्त केले आहे.

मंगळवारी (16 एप्रिल) ट्विट करत माल्ल्याने म्हटले की, पुन्हा सांगू इच्छितो की बँकांचे संपूर्ण कर्ज मी चुकवेन. भारतात प्रत्यार्पण करण्यास मला भीती वाटत असल्याचे मीडिया सांगत आहे. पण लंडन किंवा भारतीय जेलमध्ये कुठेही मी असेन, कोणत्याही परिस्थितीत कर्जाची परतफेड करेन.

किंगफिशरमध्ये मी प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळेच किंगफिशर भारतातील टॉपची आणि सर्वाधिक पुरस्कार पटकावणारी एअरलाईन्स ठरली होती. 100 टक्के कर्जाची मी परतफेड करण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला आहे. पण या मोबदल्यात मला आरोपी घोषित करण्यात असल्याचेही माल्ल्याने म्हटले आहे.

जेट एअरवेज आणि किंगफिशर भलेही एकमेकांच्या प्रतिस्पर्धक कंपनी होत्या, पण आर्थिक संकटामुळे एका मोठ्या खासगी एअरलाईन्सला बुडताना पाहून दुःख होत आहे. दुसरीकडे सरकारने एअर इंडियाला वाचवण्यासाठी 35 हजार कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा वापर केला असल्याचेही माल्ल्याने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. माल्ल्याने यापूर्वीही ट्विट करत म्हटले होते की, माझ्याकडून रोखरक्कम सरकारी बँकांनी घेतली पाहिजी, जेणेकरून ते जेट एअरवेजची मदत करू शकतील.

Leave a Comment