प्रत्येक देशात गुन्हा करणाऱ्या माणसाना शिक्षेची तरतूद आहे. त्यासाठी न्यायालये गुन्हेगार दोषी अथवा निर्दोषी याचा न्यायनिवाडा कडून त्याप्रमाणे शिक्षा सुनावतात आणि दोषी ठरलेल्यांना तुरुंगात पाठविले जाते. कझाकस्तान मधील कोस्टनी जेल मध्ये असेच खतरनाक ७३० कैदी असून त्यांना जन्मठेप झाली आहे मात्र त्यांच्याबरोबर येथे एक मादा अस्वलही जन्मठेप भोगत असून जगातील हे एकमेव अस्वल आहे ज्याला जन्मठेप सुनावली गेली आहे. तिच्यावर दोन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप शाबित झाला आहे. विशेष म्हणजे गेली १५ वर्षे कॅट्या नावाची ही तपकिरी रंगाची अस्वलीण या तुरुंगात आहे. या देशात जन्मठेप २५ वर्षाची असते मात्र कॅट्यासाठी ती आजन्म म्हणजे मरेपर्यंत राहणार आहे.
या जेल मध्ये अस्वल भोगतेय जन्मठेप
कॅट्या पहिल्यांदा सर्कस मध्ये होती. नंतर तिला सर्कस मालकाने सर्कस मधून काढले आणि कॅम्पिंग साईटवर एका पिंजऱ्यात ठेवले. तेथे पर्यटक तिला पाहण्यासाठी आणि खायला देण्यासाठी येत असत. १५ वर्षापूर्वी असेच एका ११ वर्षाच्या मुलाने तिला खायला दिले तर तिने त्याच्यावर एकदम हल्ला चढविला आणि त्याला जखमी केले. २८ वर्षाचा आणखी एक माणूस तिच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गेला तेव्हाही तिने त्याच्यावर हल्ला केला. अर्थात हा माणूस दारू प्यायला होता असे नंतर दिसून आले. मात्र या प्रकारानंतर तिला प्राणीसंग्रहालयात ठेवण्याचा निर्णय घेतला गेला पण कुणीच तिला ठेऊन घेण्यास तयार झाले नाही. तेव्हा अखेर तिची रवानगी या जेल मध्ये केली गेली.
कॅट्या येथे चांगली रुळली आहे आणि आता ती खूपच शांत झाली आहे असे सांगतात. ती मित्रत्वाने वागते, येथील कैदी तिला खायला देतात तिची काळजी घेतात. कैदी लोकांचे कुटुंबीय सुद्धा तिला खायला आणतात. कॅट्या आता या जेलची ओळख बनली असून तिचा एक पुतळा येथे उभारला गेला आहे. तिच्या कोठडीत स्विमिंग पूल आहे.
कॅट्या नुकतीच माजावर येऊन गेली आहे मात्र त्यानंतर ती नेहमीप्रमाणे खेळते आहे, उड्या मारते . जेल अधिकारी सांगतात आम्ही तिच्यासाठी नर अस्वल आणू शकत नाही याचा खेद वाटतो पण त्याला काही इलाज नाही.