चौकीदार पराठा आणि इलेक्शन थाळीची खवय्यांना भुरळ

indiathali
देशात लोकसभा निवडणूक आता चांगलीच भरात आली आहे आणि वातावरण तापते आहे. दिल्लीच्या प्रतिष्ठित कॅनॉट प्लेस भागातील एका रेस्टॉरंटने निवडणुकीसाठी खास मेनू सादर केला असून त्याला खवय्ये भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. या रेस्टॉरंटमध्ये चौकीदार पराठा आणि इलेक्शन थाळी ग्राहकांचे आकर्षण ठरली आहे. रेस्टॉरंट मालकाच्या म्हणण्यानुसार लोकांनी मतदानाला प्रोत्साहित व्हावे असा आमचा या मागचा उद्देश आहेच पण सर्व राज्ये जोडणारी आपली लोकशाही महान आहे आणि निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे हे यातून आम्हाला सांगायचे आहे.

चौकीदार पराठ्याचा स्वाद एकदम खास असून तो पाहताच लोकांच्या भुका खवळत आहेत असे मालक सांगतात. पंतप्रधान मोदी यांचा कधी कडक तर कधी अगदी मृदू होणारा स्वभाव लक्षात घेऊन तो बनविला गेला आहे. तो मिरचीमुळे झणझणीत आहेच पण पुदिन्याचा स्वाद त्याला सौम्य बनवितो आहे.

इलेक्शन थाळी दोन प्रकारात आहे. साडे[आच आणि साडे दहा किलो वजनात ती उपलब्ध असून भारताच्या सर्व राज्यातील खास पदार्थ त्यात सामील आहेत. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यापासून शेवटच्या ७ व्या टप्प्यापर्यंत ज्या ज्या राज्यात मतदान होत आहे तेथील खास पदार्थ या थाळीत समाविष्ट आहेत. भारताच्या नकाशाच्या आकाराची ही थाळी ग्राहक त्याला हवी तशी कस्टमाइज करून घेऊ शकणार आहेत. म्हणजे त्यांना हवे ते पदार्थ निवडू शकणार आहेत. काश्मीर पासून तामिळनाडूपर्यंत २८ राज्याच्या पदार्थातून ही निवड करता येणार आहे. येथे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ मिळणार आहेत.

पंजाबचा राजमा, बिहारचा लीट्टीचोखा, गुजराथी ढोकळा, खांडवी, हिमाचलचे छोले, दक्षिण राज्यातील भिसीबिली भात, दाल पंचरंगी बरोबर पंजाबी बटरचिकन, हैद्राबादी बिर्याणी, लखनौचे गलौरी कबाब, मतान पेपर फ्राय, चिकन चेट्टीनाड, गोवन फिशकरी आणि डेझर्ट मध्ये राजस्थानचा राजभोग यांचा समावेश आहे. मतदान केल्याची बोटाची शाई दाखविली की थाळी अनलिमिटेड रिफील केली जाणार आहे.

Leave a Comment