लखनौ – भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी आणखी ७ उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. बॉलिवूड आणि भोजपुरी अभिनेते रवी किशन यांना त्यामध्ये भाजपने उमेदवारी दिली. योगी आदित्यनाथ यांचा गड असलेल्या गोरखपूर येथून ते निवडणूक लढणार आहेत. तर, संत कबीर नगरातून सपा-बसपच्या आघाडीतून बाहेर पडलेले प्रविण निषाद यांना तिकीट देण्यात आले आहे.
भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार रवि किशन
आताही लोकांच्या तोंडून ‘जिंदगी झंड बा फिर भी घमंड बा’ हा भोजपुरी चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग ऐकू येतो. आता निवडणुकीच्या रिंगणात हे डायलॉग म्हणणारे रवी किशन उतरले आहेत. मागच्याच वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण निवडणूक ते लढवणार का यावर प्रश्न चिन्ह होते. त्यानंतर शेवटी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गडातून ते निवडणूक लढणार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बसपसोबत निषाद पक्षाने निवडणुकीचे सत्र सुरू होण्याआधी आघाडी केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी निषाद पक्ष बाहेर पडला. त्या पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांचे पुत्र प्रवीण निषाद यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
संत कबीर नगर येथून निषाद यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदार संघातून यापूर्वी शरद त्रिपाठी यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र, काही महिन्यापूर्वी त्यांचे प्रसिद्ध जूता कांडमध्ये नाव समोर आले होते. त्यांनी राकेश बघेल यांना चप्पलने बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला होता.