देशातून फरार झाले आहेत 36 उद्योगपती – सक्तवसुली संचालनालय

Edi
नवी दिल्ली – ज्याप्रमाणे देशातून फौजदारी गुन्हे दाखल असलेले ३६ उद्योगपती पळून गेले, त्याचप्रमाणे ऑगस्टावेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुशेन मोहन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला.

केवळ विजय माल्ल्या आणि नीरव मोदीच नव्हे, तर ३६ उद्योगपती देशातून अलीकडच्या काळात पळून गेले असल्याची माहिती ईडीने विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयाला दिली. समाजात सर्वदूर आपले संबंध आहेत, असा दावा सुशेन गुप्ता याने केला होता. त्यावर समाजात विजय माल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि स्टर्लिग बायोटेकचे प्रवर्तक संदेसरा बंधू यांचेही चांगले संबंध होते, ते तरी देखील देश सोडून गेले. ३६ उद्योगपती गेल्या काही वर्षांत अशाप्रकारे देशातून पळून गेले, असे सांगून ईडीचे विशेष वकील डी.पी. सिंह आणि एन.के. मट्टा यांनी गुप्ता याचा दावा खोडून काढताना सांगितले.

महत्त्वाच्या टप्प्यावर या प्रकरणाचा तपास असून, सुशेनच्या डायरीत उल्लेख केलेला ‘आरजी’ कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा (ईडी) करत असल्याचे ईडीचे वकील सामवेंद्र वर्मा यांनी युक्तिवादाच्या दरम्यान सांगितले. साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा गुप्ता हा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून, या प्रकरणातील पुरावा नष्ट करण्याचाही त्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

Leave a Comment