आझम खान यांच्या वक्तव्याचा रेणुका शहाणेकडून निषेध

renuka-shahane
भाजप उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल रामपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आझम खान यांच्या वक्तव्याचा अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर निवडणुकीचे तिकीट अशा व्यक्तीला दिले जाऊ नये, असे देखील म्हटले आहे. रेणुका शहाणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीदेखील त्यांची मते स्पष्टपणे नोंदविली आहेत.

रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात जया प्रदा निवडणूक लढवत असल्यामुळे आझम खान यांनी एका जाहीर सभेमध्ये भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. सर्वच स्तरांमधून त्यांच्या या वक्तव्यानंतर कडाडून टीका झाली. त्याचबरोबर जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. रेणुका शहाणे यांनीदेखील या घटनेचा निषेध करत ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.


महिलांचा आदर न राखता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आझम खान सारख्या व्यक्तींना कदापि निवडणुकीचे तिकीट देता कामा नये. एफआयआर आझम खान यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. पण केवळ एफआयआर दाखल करुन चालणार नाही. कारवाईदेखील करणे गरजेचे आहे. ही कारवाई नक्की होईल का ? २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्याची मुळात त्यांना परवानगीच देता कामा नये, असे ट्विट करत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना रेणुका शहाणे यांनी टॅग केले आहे.

Leave a Comment