स्लम क्रिकेटर्सचा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये २० एप्रिल पासून सुरु

zuggi
क्रिकेट हा अनेक देशात मोठ्या आवडीने खेळला आणि पहिला जाणारा क्रीडाप्रकार आहे. शहराच्या झोपडपट्टीतील मुलेसुद्धा त्याला अपवाद नाहीत. त्यांनाही संधी मिळेल तेव्हा आणि जागा असेल तेथे आहे त्या साधनांनी क्रिकेट खेळायला आवडते आणि त्यांचे सामने बहुदा झोपडपट्टीतील गल्ल्त्याबोळात खेळले जातात. आता त्यांच्यासाठीही वर्ल्ड कपचे आयोजन केले जात असून स्ट्रीट चिल्ड्रन वर्ल्ड कप नावाने हे सामने २० एप्रिल ते ८ मे या काळात इंग्लंडमध्ये होणार आहेत. त्यात ७ देशांच्या ८ टीम सहभागी होत आहेत.

विशेष म्हणजे या संघात मुले आणि मुली एकत्र खेळणार आहेत. भारताच्या इंडिया साउथ आणि इंडिया नॉर्थ अश्या दोन टीम या वर्ल्ड कप मध्ये सहभागी होत असून या वर्ल्ड कपचा ब्रांड अम्बेसिडर भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली आहे. एका टीममध्ये ८ खेळाडू असतील त्यात चार मुले आणि चार मुली असतील. प्रत्येक सामना २० बॉलचा असेल आणि अंतिम सामना लॉर्डस मैदानावर ८ मे रोजी होणार आहे.

भारताच्या इंडिया साउथ मध्ये चेन्नई आणि मुंबई स्लम भागातील खेळाडू आहेत तर इंडिया नॉर्थ मध्ये दिल्ली आणि कोलकाता स्लम मधील खेळाडू आहेत. या टीमना आयपीएलच्या राजस्तान रॉयल टीमने मार्गदर्शन केले आहे. इंडिया साउथ मध्ये सामील असलेली मानखुर्द मुंबईची शमा आणि भवानी प्रथमच मुलांबरोबर खेळणार आहेत. त्या म्हणतात, त्यामुळे बाकीच्यांना प्रेरणा मिळेल आणि भाऊ बहिणीला प्रोत्साहन देतील अशी आशा आहे कारण आजही अनेक घरातून मुलीना खेळण्यासाठी बाहेर पाठविले जात नाही. याच टीममधली नागलक्ष्मी नारळाच्या झावळीची बॅट करून क्रिकेट खेळत होती. ती म्हणते झावळी हि काही योग्य बॅट नाही पण गल्लीत खेळायला चालते. पॉलराज हा मुलगा धोनीचा फॅन आहे आणि तो धोनी सारखाच हेलिकॉप्टर शॉट मारतो.

या स्लम मिलेनिअरसाठी काम करणारी संस्था स्ट्रीट चाइल्ड युनायटेड या वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे. या संस्थेशी जोडलेल्या एनजीओनी आपल्या आपल्या भागात ६ महिने सिलेक्शन ट्रायल घेतल्या आहेत आणि नंतर त्यातून टीम निवड केली गेली आहे. हे सामने टेनिस बॉलने खेळले जाणार आहेत.

Leave a Comment