येरकाड, तमिळनाडूतील सुंदर हिल स्टेशन

yerkad
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता सुरु झाल्या आहेत आणि मुलांच्या शाळाही बंद झाल्या आहेत तेव्हा कुटुंबासह कुठेतरी हिल स्टेशनला जाण्याच्या विचार करत असाल तर तामिळनाडूतील येरकाडचा विचार जरूर करा. नेहमीच्या हिल स्टेशनपेक्षा वेगळे आणि निसर्गाशी अधिक जवळ असलेले हे सुंदर स्थळ तुमची नक्कीच तृप्ती करेल यात शंका नाही. सेलम जिल्ह्यात हे ठिकाण असून तेथे पाहण्यासाठी अनेक सुंदर सुंदर स्थळे आहेत. परफेक्ट निसर्ग अनुभवायची संधी येथे तुम्हाला नक्कीच मिळेल.

temple
या गावाच्या मध्यभागी असलेले येरकाड सरोवर बिग लेक नावानेही ओळखले जाते. चारी बाजूनी हिरवळ आणि बोटिंगची सुविधा येथे आहेच पण मध्यभागी असलेल्या बेटावर हरणे आणि मोर मोठ्या संख्येने आहेत. येथे बोटीतून न जाता ओव्हरब्रिजवरूनही जाता येते. येथील थंड शीतल हवा उन्हाळ्याचा ताप विसरायला लावणारी आणि तन मन ताजे करणारी आहे. पॅगोडा पॉइंटवरून संपूर्ण शहराचे विहंगम दृश्य न्याहाळता येते. येथे पॅगोडाच्या आकारातील एक दगडी मनोरा आहे.

bear
शेवराय मंदिर हे समुद्रसपाटीपासून ५३२६ फुट उंचीवरचे ठिकाण येथील सर्वोच्च स्थान असून थेथे स्थानिक देवता सरवरन व त्याची पत्नी कवरीअम्मा यांचे मंदिर आहे. येथील आदिवासी मे महिन्यात वार्षिक उत्सव साजरा करतात. येथेच १८ व्या शतकातील अस्वल गुहा आहे. महाराजा टिपू सुलतान याचा उपयोग गुप्त स्थान म्हणून करत असे असे सांगितले जाते मात्र पूर्वी येथे खूप अस्वले होती त्यामुळे तिला अस्वल गुहा असे नाव पडले आहे. लेडीज सीट या नावाचे ठिकाण ब्रिटीश कालीन असून तेथे ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या बायका किटी पार्टी करत असत असे सांगितले जाते. येथून सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. येथे एक टेलिस्कोप आहे त्यातून मैदानी भाग आणखी जवळून न्याहाळता येतो.

falls
सिल्क आणि रोज फार्म अशी दोन अन्य ठिकाणे आहेत, सिल्क फार्म मध्ये रेशमी किडे, कोश आणि त्यापासून सिल्क कसे मिळते हे पाहता येते तसेच पारंपारिक कलाकुसर पाहता येते तर रोज गार्डन मध्ये विविध जातीचे गुलाब आहेत. शहरापासून ४ किमीवर किलीयूर धबधबा आहे. हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे साहसी लोकांना ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो. २०० अवघड पायऱ्या चढून वर जाता येते. येरकाड येथे जाण्यासाठी विमान, रेल्वे मार्ग आहेत. जवळचा विमानतळ तिरुचिरापल्ली येथे आहे तसेच कोइम्बतुर आणि बंगलोर येथूनही जाता येते. सेलम हे रेल्वे जंक्शन असून येथून बस किंवा खासगी गाड्यांनी जाता येते.

Leave a Comment