या कार किल्ल्यांच्या किमतीत येईल सेदान कार्सचा ताफा

carkey
कार्सच्या किमती कोट्यावधी रुपयात आहेत यात आता काही नवल राहिलेले नाही. मात्र काही कार्सच्या किल्ल्यांच्या किमतीत बलेनो, ब्रेझा सारख्या कार्सचा एक ताफा विकत घेता येईल यावर विश्वास बसणे थोडे कठीण आहे. पण बातमी अगदी खरी आहे. अवैन (Awain) नावाची एक कंपनी अश्या महागड्या किल्ल्या बनविण्यासाठी फेमस आहे. विशेष म्हणजे ते ज्या महागड्या कार्ससाठी अश्या महागड्या किल्ल्या बनवितात त्या यादीत अॅस्टन मार्टिन, बेंटली, बुगाटी, रोल्स रॉयास, फेरारी, पोर्शे, मॅक्लरेन यांचा समावेश असला तरी ऑडी, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूचा समावेश नाही. अश्या किल्ल्या बनवून देणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे.

killi
या किल्ल्यांवर मौल्यवान रत्ने जडविली जातात आणि त्यात सोन्याचा वापरही केला जातो. ग्राहकांना कस्टमाइज करून या किल्ल्या मिळतात. रोल्स रॉयास फँटमसाठी अशीच एक किल्ली बनविली गेली असून तिची किंमत आहे ३.८८ कोटी. त्यात मौल्यवान रत्ने तसेच ३४.५ कॅरेटचे हिरे, जडविली गेली आहेत. हि कंपनी ३ वेगवेगळ्या प्रकारे किल्ल्या बनविते. त्यातील सर्वात परवडणारी किल्ली क्वांटम लाईनची असून तिच्यासाठी ५५ हजार डॉलर्स मोजावे लागतात. त्यात १८ ते २४ कॅरेट गोल्ड आणि ३.४५ कॅरेटचे ३५४ हिरे जडविले जातात. दुसरी सेरेनिटी लाईनसाठी १००२०९ डॉलर्स मोजावे लागतात. त्यात २० कॅरेटचे १२०० हिरे आणि सोने असते तर तिसरी फँटम साठी ५,६२,९२५ डॉलर्स म्हणजे ३ कोटी ८८ लाख रुपये मोजावे लागतात त्यात ३४.५ कॅरेटचे हिरे आणि १८ ते २४ कॅरेट सोने शिवाय अन्य मौल्यवान रत्ने जडविली जातात.

phantom
फिनलंडमध्ये हे किल्ल्या बनविण्याचे काम केले जाते. तेथे एक टीम १०० ते ३०० तास काम करून किल्ली तयार करते. या टीममध्ये वॉचमेकर, ज्युवेलर आणि मेकॅनिकल इंजिनिअर असतात. हे सर्व काम हाताने केले जाते. कंपनीने क्वांटम आणि सेरेनिटी लाईनच्या २०-२० किल्ल्या बनविल्या आहेत तर फँटम साठी एकच किल्ली बनविली गेली आहे. कंपनीचे सीइओ जल्मारी मतोला म्हणतात कारच्या किमतीची किल्ली हे ऐकायला विचित्र वाटेल पण मला वाटते, हौसेला मोल नसते. जगातल्या बेस्ट कार्स जे घेऊ शकतात ते अश्या बेस्ट किल्ल्यांसाठी योग्य ग्राहक असतात. आणि अश्या किल्ल्या फक्त आम्हीच बनवतो याचा आम्हाला अभिमान आहे.

Leave a Comment