बाटा कंपनीला 3 रुपयांची पिशवी पडली 9 हजार रुपयांना

bata
चंदीगड – एखाद्या मॉल अथा दुकानांतून खरेदी केल्यानंतर ग्राहकांना पिशवी दिली जाते, पण या पिशवीचे ग्राहकांकडून पैसे आकारले जातात. या पिशव्यांवर त्या दुकानाची अथवा कंपनीची जाहिरात देखील केली जाते. पण ग्राहकांकडे याबाबत पैशांची सक्ती करत त्यांची लूट करण्यात येते. आता ग्राहक मंचाने याप्रकरणी एका तक्रारीची दखल घेत, बाटा कंपनीला तब्बल 9 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ग्राहक मंचाने बाटा इंडिया लिमिटेड कंपनीला ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पिशवीसाठी तीन रुपये मागितल्याबद्दल बाटाविरोधात चंदिगडमधील एका ग्राहकाने तक्रार केली होती. चंदिगड ग्राहक मंचाने ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत बाटाला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ग्राहकाला हे पैसे देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. 5 फेब्रुवारी रोजी बाटामधून त्या ग्राहकाने बुट विकत घेतले होते. आपल्याला त्यासाठी 402 रुपयांचे बिल देण्यात आले. पण, यामधील तीन रुपये पेपर बॅगसाठी आकारण्यात आले असल्यामुळे, ग्राहक मंचाकडे दिनेश यांनी तक्रार केली. बाटा आपल्याकडून तीन रुपये आकारत पिशवीच्या सहाय्याने आपल्या ब्रँण्डचे प्रमोशन करत होते, जे चुकीचे आहे, असे दिनेश यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच तीन रुपये परत करण्याची आणि झालेल्या त्रासाबद्दल नुकसानभरपाई करण्याची मागणीही ग्राहकाने केली होती.

तक्रारदाराची याप्रकरणी दखल घेत, बाटा इंडियाला आपल्या सर्व ग्राहकांना मोफत पेपर बॅग देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. तसेच, वस्तू विकत घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला कोणतेही पैसे न आकारता पिशवी देणे ही त्या दुकानाची जबाबदारी आहे, असेही ग्राहक मंचाने सुनावले आहे. बाटा इंडियाला पिशवीचे पैसे रिफंड करण्याचा आणि खटल्यासाठी आलेला एक हजार रुपये खर्च जमा करण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. तसेच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 3000 रुपये भरपाई देण्याचेही आदेशात म्हटले आहे. शिवाय राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कायदेशीर विभागाशी संबंधित खात्यात 5 हजार रुपये डिपॉझिट करण्यासही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment