भाजप आमदार मंदा म्हात्रेंना दोनदा मतदान करण्याचे वक्तव्य भोवले

manda-mahtre
नवी मुंबई : भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा अजब सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे. मंदा म्हात्रे यांच्यावर याविरोधात निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हात्रे यांनी कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. रविवारी कोपरखैरणे येथे ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदा म्हात्रे यांचा या प्रसंगी बोलताना तोल गेला. पण चूक लक्षात येताच दोन ठिकाणी मतदान करण्याचा सल्ला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिला होता, अशी पुष्टी जोडत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मंदा म्हात्रे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

Leave a Comment