दिल्लीच्या मध्यवस्तीतले हे स्थान अनेकांसाठी अज्ञातच

kahnkah
भारताची राजधानी दिल्ली पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक रोज येत असतात. दिल्ली मधील अनेक ऐतिहासिक वास्तू पर्यटकांच्या यादीत असतात मात्र खुद्द दिल्लीतील रहिवासी दिल्लीच्या मेहरोली या गर्दीच्या आणि ऐन मध्यवस्तीत असलेल्या एका अश्याच ऐतिहासिक जागेबद्दल अनभिज्ञ आहेत असे दिसून येते. मेहरोलीच्या बाजारात या जागेचे छोटेसे प्रवेशद्वार आहे मात्र ते सहजी लक्षात येत नाही. ही जागा फार चर्चेत नाही मात्र ती ऐतिहासिक महत्वाची आहे यात शंका नाही. या ठिकाणाला हिजडों का खानकाह असे नाव आहे. कुतुबमिनार जवळ असलेल्या या जागेच्या नावावरून ती किन्नर समुदायाला समर्पित आहे हे लक्षात येते. किन्नर समुदायाला अध्यात्माशी जोडणारा हा दुवा आणि ही जागा अतिशय शांत आणि लोकांची वर्दळ कमी असलेली आहे.

hijaro
या जागेत किन्नर समुदायाचे काही कार्यक्रम होतात. येथे बरेचदा गरिबांना मोफत जेवण दिले जाते तेव्हा हा परिसर गजबजून जातो. बाहेर छोटे लोखंडी गेट आहे तेथे कधीच कुलूप नसते. आत एक जुनी मशीद आहे आणि या परिसरात सुमारे ५० हिजड्यांच्या कबरी आहेत. हा सारा परिसर अतिशय स्वच्छ आहे. या जागेची देखभाल किन्नरच करतात. लोदी वंश शासन काळातील या जागेत असलेल्या किन्नर कबरी १५ व्या शतकातील असल्याचे सांगतात. थोड्या उंचावर आणखी एक कबर असून तिला आच्छादन केले गेले आहे. ही कबर हाजी किंवा मियासाब यांची असल्यचे सांगितले जाते.

किन्नर लोकांसाठी हे खास स्थान आहे आणि केवळ दिल्लीच नाही तर शेजारी हरियाना, पंजाब राज्यातून तसेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश येथूनही किन्नर येथे येतात. ते बहुदा १०,१५ अथवा ५० अश्या गटात येतात. येथे येऊन ते दुवा करतात. फुले चढवितात, आणि गाणी, नृत्य, प्रार्थना अशी सेवा करतात. गुरुवारी येथे गर्दी असते. या जागेची मालकी किन्नर हाजी पन्ना यांच्याकडे असून येथे आसपास दुकाने आहेत. त्याचे भाडे आजही १०० रुपये आहे.

येथे सर्वसामान्य लोकांना सहज प्रवेश मिळत नाही. मात्र विनंती केली तर प्रवेश दिला जातो. सुफी अध्यात्माचे हे केंद्र आहे असेही सांगितले जाते.

Leave a Comment