आयव्हीएफ क्लिनिकचा डॉक्टरच ठरला ४९ मुलांचा पिता

children
नेदरलंडच्या रोटरडम मध्ये घडलेली ही घटना जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे कारण येथे आयव्हीएफचे क्लिनिक चालविणारा एक डॉक्टर क्लिनिकमध्ये अपत्यप्राप्ती साठी येणाऱ्या महिलांना डोनर ऐवजी स्वतःचेच स्पर्म पुरवीत होता आणि त्यातून किमान ४९ मुलांचा जन्म झाला असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. कार्बत नावाच्या या डॉक्टरचा २०१७ मध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळे आता न्यायालयात दाखल असलेल्या या प्रकरणात तो दोषी ठरला तरी त्याला शिक्षा होऊ शकणार नाही. त्यांचे क्लिनिक २००९ मध्येच बंद केले गेले होते कारण या क्लिनिक मध्ये अनियमितता असल्याचे, डेटा गडबडी होत असल्याची शंका डॉक्टरांच्या एका गटाने व्यक्त केली होती.

डॉक्टरांच्या या गटाने या क्लिनिकमधील उपचारानंतर जी मुले जन्माला आली त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे खरेच रक्ताचे नाते आहे काय अशी शंका काढली होती. त्यावर स्थानिक न्यायालयाने डिफेन्स फोर चिल्ड्रेन नावाच्या संस्थेला या मुलांची खरी ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचण्या करण्याचे आदेश दिले. यातील बरीच मुले हुबेहूब क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरसारखी दिसत होती. त्यामुळे या डॉक्टरचे डीएनए त्याच्या टूथब्रश मधून घेण्यात आले कारण २०१७ ला या चाचण्या सुरु झाल्या तेव्हा हे डॉक्टर महाशय ८९ व्या वर्षी मरण पावले होते. मात्र मृत्युपूर्वी त्याने तो किमान ६० मुलांचा बाप असल्याचे कबुल केले होते.

आयव्हीएफ क्लिनिकसाठी काही कठोर नियम आहेत. त्यानुसार एका डोनरचा स्पर्मचा वापर ६ मुलांपेक्षा अधिकवेळा करता येत नाही. कार्बत डॉक्टरने हा नियम धाब्यावर बसविला होताच पण येथे येणारया महिलांना सुद्धा तो त्याचेच स्पर्म वापरतोय याची माहिती नव्हती. म्हणजे त्यांचीही फसवणूक केली गेली होती. अर्थात न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या तपासणीत किमान ४९ मुलांमध्ये डॉक्टरचे डीएनए सापडले असले तरी आता साधारण तिशीत असलेली ही मुले समाधानी आहेत. कारण अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर त्यांना निदान त्यांचा खरा बाप कोण ते समजले आहे आणि यातील बरेचजण आता एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत.

Leave a Comment