लग्नात लेडी रोबो फोटोग्राफर ठरली आकर्षण

robot
लग्न हा बहुतेक सर्वांच्या आयुष्यात लक्षात राहणारा किंवा अविस्मरणीय सोहळा असतो. वधूवरांसाठी तो महत्वाचा दिवस असतोच पण वऱ्हाडी मंडळीही विवाहसोहळ्याच्या अनेक आठवणी बरोबर नेत असतात. वधूवर हे या दिवशी आकर्षणाचे केंद्र असतात. युके मधील एका जोडप्याने त्यांचे वेडिंग यादगार बनावे म्हणून रोबो फोटोग्राफर आणला आणि या लेडी रोबो फोटोग्राफरने नव्या नवरा नवरी इतकेच किंबहुना थोडे जास्तच पाहुण्याचे लक्ष वेधून घेतले. हा विवाह ७ एप्रिलला साजरा झाला.

wedding
इवा असे या रोबोचे नाव असून हे नाव मुलींचे असते म्हणून ती लेडी रोबो ठरली. स्मार्ट इंटेलिजन्स आणि त्यात क्युट लुक यामुळे तिच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या यात विशेष काहीच नव्हते. तिने विवाह समारंभाचे शेकडो फोटो काढले. सर्व्हिसरोबो डॉट कॉमने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार या ह्युमनाइज्ड रोबोने लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांशी संवादही साधला. खास फोटोग्राफीसाठी हा रोबो बनविला गेला आहे त्यामुळे तो पाहुण्यांचे चेहरे ओळखू शकतो. तुमचा फोटो काढायचा का असे इवा रोबो पाहुण्यांना विचारात होती आणि संमती मिळाली की फोटो क्लिक करत होती. हा फोटो तिच्या इंटरफेसवर त्वरित दिसत होता तसेच तो लगेच प्रिंट करता येतो. प्रिंट नको असेल तर सरळ सोशल मिडीयावर शेअर करता येतो.

एवा रोबोने फोटो काढणे सर्वाना सोयीचे होत होते कारण कुणालाच आपली जागा सोडून फोटोसाठी जावे लागत नव्हते. कारण एवाच सगळीकडे फिरून फोटो काढत होती. अर्थात सर्व्हिस कंपनीच्या मते एवा सारखे रोबो फोटोग्राफर फोटो कसे काढायचे या तंत्रज्ञानाने युक्त असले तरी ते पारंपारिक विवाह फोटो काढण्यासाठी नाहीत तर अतिरिक्त फोटोग्राफर म्हणूनच सध्यातरी काम करू शकतात.

Leave a Comment