रेशमाची गोष्ट (सिल्क स्टोरी)

silk

वेगवेगळ्या काळात भारताच्या वेगवेगळ्या प्रतिमा जगासमोर आल्या असल्या तरी पाच हजार वर्षांच्या प्राचीन परंपरेत कायम टिकून राहिलेली कला म्हणजे वस्त्रोद्योग ! भारतात बनणारं रेशीम, मलमल, हाताने रंगविलेले कॉलेको फार पूर्वीपासून जगात प्रसिद्ध आहे. मात्र भारतीय जीवन आणि संस्कृतीत रेशमाचे धागे असे गुंफले गेले की त्याची वीण आजही किंचितशीही सैल झालेली नाही. ख्रिस्तपूर्व काळापासून ग्रीक लोक भारतात रेशीम खरेदीला येत असत याचे जसे पुरावे सापडतात त्याचप्रमाणे भारत आणि चीन यांच्यात रेशमाचा व्यापार होत होता याचेही संदर्भ उपलब्ध आहेत.

भारताची रेशीमपरंपरा फार मोठी आहे आणि कदाचित चीनपेक्षा जुनीही. हडप्पा, मोहेंजोदाडोच्या उत्खननांतह असं आढळतं की त्याकाळी रेशमी वस्त्रे विणण्याची कला अवगत होती. एवढंच नव्हे तर रेशमी भरतकामाची कलाही चांगलीच विकसित झालेली होती. त्याला केवळ उपभोग्य वस्तू इतकंच महत्त्व नव्हतं तर त्याचा संबंध पावित्र्याची जोडला जात असे.

रेशमाची जंगले असत. या रेशीमकिड्यांचे म्हणजेच फुलपाखरांचे स्थानिक लोक संरक्षण करत. कोशापासून रेशीम मिळविताना कोशावस्थेत अळी मारली जात नसे तर कोशातून पतंग बाहेर पडल्यावरच म्हणजे पतंगाचे जीवनचक्र पूर्ण झाल्यावरच हे रेशीम मिळविले जाई. आणि म्हणून ते शुद्ध व पवित्र मानले जाई. या रेशमापासून बनत देवादिकांची वस्त्रे तसेच देवादिकांचे रथ ओढण्यासाठी लागणारे दोर आणि पूजाकर्म करताना नेसायची वस्त्रेही या रेशमापासून बनत असत.

रेशमामध्ये जी वैशिष्ठ्ये आहेत ती अन्य कोणत्याच धाग्यात नाहीत असे म्हटले तर ते गैर ठरू नये. राजेशाही, गर्भश्रीमंत, स्वर्गीय अशा शब्दांनी रेशमाची वैशिष्ठ्ये सांगितली जातात. भारतात आंध्र, कर्नाटक, आसाम, बिहार, महाराष्ट्र, गुजराथ, मध्यप्रदेश, प.बंगाल, जम्मू, तमीळनाडू, उत्तरप्रदेश इत्यादी राज्यात रेशमाचे उत्पादन होते.

आज जगात कापड उद्योगाच्या तुलनेत रेशमी वस्त्रांचे उत्पादन केवळ ०.२ टक्के इतकेच आहे. मात्र तरीही हा व्यवसाय भरभराटीत आहे. देशाच्या आर्थिक विकासाचे साधन म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिले जाते. आशियातील चाळीस देशांत रेशीम तयार होते, त्यात चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. जगातल्या एकूण रेशीम उत्पादनाच्या ९० टक्के रेशीम आशियात बनते.

तुतीच्या पानांवर किडे पाळून त्यापासून मिळविलेलं रेशीम हे आज सर्वाधिक प्रचलित आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित केलं जाणारं रेशीम होय. अंडी,अळी, कोश आणि पतंग अशा रेशमाच्या किड्याच्या चार अवस्थांपैकी रेशमासाठी माणसानं त्याचं हे जीवनचक्र कोशाच्या स्थितीतच थांबविले आहे.

Leave a Comment