या बांधकाम व्यावसायिकाचे वय ५८, लग्ने १२०, मुले २८


बहुविवाह ही संकल्पना जगाला नवीन नाही. अनेक धर्मांत एकापेक्षा अधिक लग्ने करण्यास प्राचीन काळापासूनच मंजुरी दिली गेली आहे. कुणी किती लग्ने केली याच्या चर्चाही नित्यनेमाने होत असतात. शंभरी ओलांडलेले व निम्म्या गोवर्‍या मसणात पोहोचलेले लोकही हौसेहौसेने लग्न करतात हे आपण ऐकतो. थायलंडमधील एका बांधकाम व्यावसायिकाने मात्र या बाबतीत उच्चांक केला आहे. वयाच्या ५८ व्या वर्षातच त्याने १२० लग्ने केली आहेत व त्याला २८ मुलेही आहेत. विशेष म्हणजे त्याच्या लग्नाच्या सर्व बायकांना त्याने इतकी लग्ने केल्याची माहिती आहे व त्यापैकी कुणीही त्याला विरोध केलेला नाही.

तंबन पॅजर्ट असे या इसमाचे नांव आहे. नकोन कायोक भागात तो राहतो. तो तिथला जिल्हाप्रमुखही आहे. इतकी लग्ने करणे हे बेकायदा आहे हे त्याला मान्य आहे. तो सांगतो १७ व्या वर्षी त्याचे पहिले लग्न झाले. बांधकामाचा व्यवसाय तो करतो व त्यामुळे त्याला वेगळीच आदत जडली. जेथे तो बांधकाम करतो, घर बांधतो, तेथे नवीन बायको घेऊन जाण्याची ही आदत. अर्थात नवीन लग्न करताना तो पूर्वीच्या सगळ्या बायकांना त्याची कल्पना देतो. त्याच्या २२ बायका त्याच्या घराच्या आसपासच राहतात तर बाकी देशात अन्य जागी आहेत.

पॅजर्ट तसा कुटुंबवत्सल आहे. म्हणजे इतक्या बायका आणि इतकी मुले असली तरी तो प्रत्येकाची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्या सर्व गरजा पुरवतो व ज्यांना घरे नाहीत त्यांना घरेही देतो.

Leave a Comment