नवे वेडिंग डेस्टीनेशन – मॉरिशस

maur

मुंबई दि. १९ – श्रीमंत भारतीयांनी आता आपल्या घरातील लग्ने साजरी करण्यासाठी थेट मॉरिशसला पसंती दिली असल्याचे अलिकडे दिसून येत असून हे अतिश्रीमंत आपले पै पाहुणे, कुटुंबिय तसेच मित्रमैत्रिणी आणि अगदी बॉलिवूडमधल्या सिताऱ्यासह विमाने भाड्याने घेऊन मॉरिशसमध्ये लग्नसोहळे साजरे करत आहेत.

अशा कुटुंबात भारतीय अब्जाधीश उद्योजकांचा मोठा भरणा असून ओबेरॉय मॉरिशस तसेच इंटर कॉन्टीनेन्टल मॉरिशस अशा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पंचताराकित हॉटेलमधून हे विवाह साजरे होत आहेत. येथे पारंपारिक धार्मिक विधींबरोबरच बीच पार्ट्या बॉलिवूड तारकांचे डान्स आणि विविध पदार्थांनी सजलेल्या मेजवान्या असा भरगच्च कार्यक्रम होत असल्याचे खुद्द भारताचे मॉरिशसमधील राजदूत टी.पी. सीतारामन यांनीच सांगितले आहे.

सीतारामन याविषयी बोलताना म्हणाले की दोन दिवसांपासून अगदी आठवड्यापर्यंत हे विवाह समारंभ पार पडत आहेत आणि त्यासाठी कोट्यावधी रूपये खर्चही केले जात आहेत. साधारण ४०० लोकांसाठी या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिवसाला जेवण व राहणे यासाठीचा खर्च दीड कोटी रूपयांच्या घरात जातो. शिवाय विमान भाडे, बॉलिवूड कलाकारांचे मानधन, यासाठीचा जादा खर्च वेगळाच.

ओबेरॉय मॉरिशस या पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापकांनीही याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की आमच्याकडे भारतीय शेफ आहेत त्यामुळे भारतीय पदार्थंचा आस्वाद घेता येतो तसेच चायनीज, थाई, कॉन्टिनेन्टल अशा मेजवान्यांचाही चॉईस देता येतो. भारत आम्हाला पूर्वीपासूनच हृदयाजवळ असलेला देश आहे. त्यामुळे भारतीयांचा पाहुणचार करताना आम्हाला अधिक आनंद होतो. मॉरिशसमधील ६८ टक्के लोकसंख्या भारतीय मूळ असलेली आहे. आमचे पंतप्रधान आणि अध्यक्षही भारतीय वंशाचेच आहेत.

विवाहविधीबरोबरच हनीमूनसाठी मॉरिशसला येणाऱ्या भारतीय जोडप्यांची संख्याही अलिकडे लक्षणीयरित्या वाढली आहे. येथील निसर्ग सौंदर्य, शांत सुंदर समुद्र किनारे आणि वॉटर स्पोर्टस हनिमुनला येणार्यां ना भुरळ घालतात शिवाय भारतीयांना मॉरिशसमध्ये परके वाटत नाही कारण येथील स्थानिक लोकही भारतीयांचे विशेष प्रेमाने स्वागत करतात असेही ते म्हणाले.

Leave a Comment