भारतातील विवाहांच्या कांही विचित्र पद्धती


भारतात विविधता आहे व या विविधतेतून एकता आहे. विभिन्न चालीरिती, संस्कृती चे अनेक जातीजमातींचे लोक भारतात आहेत. त्यांच्या रूढीपरंपरा वेगळ्या असल्या तरी विवाह ही रूढी बहुतेक सर्व समाजांत आहे. मात्र विवाहामध्येही येथे विविधता आहे. कांही जातीजमातीतील विवाह पद्धती खूपच विचित्र आहेत व आजही त्या पाळल्या जातात. अशाच कांही पद्धतींची माहिती


हिमाचल प्रदेशातील किन्नोर येथील विवाह पद्धतीला घोटुल असे नांव आहे. येथे ही परंपरा शेकडो वर्षांपासून पाळली जाते. त्यात एका कुटुंबातील सर्व भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात. महाभारत काळात पांडवांनी द्रौपदी व कुंतीसह त्यांच्या अज्ञातवासातील कांही काळ येथील गुहेत काढला होता असा समज आहे. पाची पांडवांनी द्रौपदीशी विवाह केला होता. तीच प्रथा येथे आजही पाळली जाते व म्हणून सर्व भाऊ एकच मुलीशी लग्न करतात.


मेघालय येथील खासी अदिवासी जमातीत महिलेला हवी तेवढी लग्ने करण्याची परवानगी आहे. महिला येथे हवी तेवढी लग्ने करू शकतात व नवर्‍यांना सासरी आणून ठेवू शकतात. या जमातीत पुरूषांपैक्षा महिलांना अधिक अधिकार आहेत व त्यामुळे येथे महिलांचे वर्चस्व आहे. आता आधुनिकीकरणाचे वारे येथेही वाहू लागले आहेत व त्यामुळे ही प्रथा बंद करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.


छत्तीसगढ येथील धुरवा आदिवासी जमातीत बहीण भावांच्यात विवाह होतो. त्यात मामेभाऊ आतेभाऊ यांचाही समावेश असतो. येथे लग्नाचा प्रस्ताव आला आणि तो नाकारला तर दंड भरावा लागतो.


राजस्थानात उदयपूर, सिरोही, पाली व गुजराथेतील गरासिया जमातीत लग्नापूर्वीच मुलगा मुलगी एकत्र राहतात व त्यांना मूल झाले तरच विवाहाची परवानगी दिली जाते. हे लोक भीली, मेवाडी, मारवाडी, गुजराथी भाषा बोलतात. मुलगा मुलगी एकत्र राहिल्यानंतर त्यांना मूल झाले नाही तर लग्नाला मान्यता दिली जात नाही.


दक्षिण भारतात मामा भाचीचा विवाह करण्याची प्रथा आजही अनेक घरातून पाळली जाते. सुशिक्षित समाजात आजही मामा भाची विवाह या सर्वात चांगला मानला जातो. कधी कधी मामा व भाची एकमेकांशी लग्न करण्यास तयार होत नाहीत तरीही कुटुंबिय जबरदस्ती करून असे विवाह लावून देतात. अर्थात या विवाहांमागे जमीन व मालमत्ता हे कारण असल्याचे सांगितले जाते. म्हणजे बहिणीने माहेरच्या मालमत्तेत हक्क सांगू नये म्हणून तिच्या मुलीलाच लग्न करून घरी आणले जाते.